तेहरान - इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर भीषण बॉम्ब हल्ला करणे सुरूच ठेवले आहे. आता याबाबत इराणने इस्रायलला धमकी दिली आहे. जर इस्त्रायलने गाझावरील हल्ले बंद केले नाही तर इतर आघाड्यांवर युद्ध सुरू होऊ शकते असं इराणने म्हटलं आहे. पॅलेस्टिनी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला. हमासने सर्वात आधी इस्रायलवर हजारो रॉकेट डागले.
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या भागात घुसून उघडपणे हत्याकांड घडवले. या हल्ल्यात आतापर्यंत १२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायलनेही प्रतिहल्ला चढवला आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत वीज, पाणी, इंधन आणि अन्न पुरवठा रोखला आहे. गाझामध्ये झालेल्या इस्त्रायली एअरस्ट्राइकमध्ये १४०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीरबदोल्लाहियन गुरुवारी संध्याकाळी बेरुतला पोहचले. त्याठिकाणी लेबनानी अधिकाऱ्यांसह हमास आणि पॅलेस्टिनी इस्मालिक जिहादच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गाझावर सुरू असलेली आक्रमकता, युद्धगुन्हे आणि वेढा यामुळे इतर आघाड्या उघडण्याची शक्यता आहे. इस्रायलने गाझावर बॉम्बफेक सुरू ठेवली तर इतर आघाड्यांवर युद्ध भडकू शकते. यापूर्वी अमीराब्दुल्लाहियान इराकला गेले होते. येथे त्यांनी पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांची भेट घेतल्यानंतर अशाप्रकारचे विधान केले आहे.
इस्त्रायलच्या हमासच्या हल्ल्यानंतर इराणच्या भूमिकेवर प्रश्न उभे राहत आहेत. इराणने हमासला फंड दिला होता आणि त्यासोबत शस्त्रे पुरवली होती. हमासच्या अधिकाऱ्यांनी याचा नकार दिला, हल्ल्याच्या योजनेत इराणकडून थेटपणे सहभाग आणि त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे त्यांनी नाकारले. इस्त्रायलच्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अरब जगतात संतापाची भावना आहे. इस्त्रायलच्या हल्ल्याविरोधात इराणसह सौदी अरेबियाही पुढे आला आहे.