बीजिंग: पूर्व लडाखलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या चिनी लष्कराच्या युद्धसज्जतेबद्दल त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सर्व माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही वर्षांपासून स्थिती सातत्याने बदलत आहे. त्यामुळे अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत असे ते म्हणाले. जिनपिंग यांनी लडाख सीमेवरील स्थिती जाणून घेतल्यानंतर भारत आणखी सतर्क झाला आहे.
चीनभारताच्या काढत असलेल्या कुरापतींमुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मुख्यालयातून खुंजेराब येथे तैनात चिनी सैनिकांशी संवाद साधला.
जिनपिंग यांनी चिनी सैनिकांना काही प्रश्नही विचारले. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना एका चिनी सैनिकाने सांगितले की, सीमेवर आम्ही अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत आहोत. सैनिकांमुळेच देशाच्या सीमा सुरक्षित असतात. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.
‘तुम्हाला रोज ताज्या भाज्या मिळतात का?’
पूर्व लडाखच्या सीमेवर तैनात असलेल्या चिनी सैनिकांना हवामानाचा करावा लागणारा सामना व त्यांना मिळणारी रसद याबद्दलही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी माहिती घेतली. तुम्हाला जेवणासाठी रोज ताज्या भाज्या मिळतात का, अशीही विचारणा त्यांनी सैनिकांना केली.
दोन्ही देशांतील तणाव कायम
- पूर्व लडाखच्या सीमेवर पँगाँग लेक परिसरात ५ मे २०२० रोजी चीनने भारताची कुरापत काढली होती. त्यामुळे तणाव निर्माण होऊन भारत व चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते.
- गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात चीनचे ४२ सैनिक ठार झाले, तर भारताचे २० जवान शहीद झाले होते. पूर्व लडाख येथील सीमातंटा सोडविण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करांत आजवर चर्चेच्या १७ फेऱ्या झाल्या, पण कोणताही तोडगा निघलेला नाही.