पीडित मात्र वंचितच भूस्खलनग्रस्त गावाचे चित्र : मदत मिळविण्यासाठी शेजारील गावातूनही लोंढे
अबी बराक : भूस्खलनाने होत्याचे नव्हते करून टाकलेल्या अफगाणिस्तानातील या दुर्गम खेड्यात जगभरातून मदतीचा ओघ लागला असला तरी ही मदत गरजूंपर्यंत पोहोचणे दुष्कर बनले आहे. मुसळधार पावसानंतर लगतच्या डोंगराचा एक मोठा भाग खचून त्याच्या ढिगार्याखाली अबी बराक हे अख्खे गावच गाडले गेले आहे. या आपत्तीत २१०० जणांचा बळी गेला असण्याची शक्यता असून हजारो बेघर झाले आहेत. संकटग्रस्त अबी बराकच्या मदतीसाठी अख्खे जगच धावल्याचे चित्रच दिसत आहे. राहुट्या, पाणी, अन्नधान्य आणि ब्लँकेटस्चा ओघ सुरू आहे. सामुदायिक देणगी व आंतरराष्ट्रीय योगदानासह प्रत्येक स्तरातून मदत येत आहे. मात्र,मदतीचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमधील लढाई आणि परिणामकारक व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा अभाव आदी अडथळ््यांमुळे ती गरजूपर्यंत पोहोचणे कठीण बनल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मदतसाहित्य मिळविण्यासाठी नजीकच्या गावांमधील लोकांचे लोंढेही उसळत असल्याने मदत साहित्य वितरित करणे दुष्कर बनले आहे. आमच्याकडे खर्या पीडितांची यादी नसून हीच एक मोठी समस्या आम्हाला भेडसावत आहे, असे बदखशा प्रांतातील अफगाण रेड क्रेस्केन्टचे प्रमुख अब्दुल्ला फैज यांनी सांगितले. आम्हाला येथील ग्रामस्थ नेमके कोण आहेत हे माहिती नाही, असेही ते म्हणाले. आम्ही मदत वितरण सुरू केल्यानंतर अनेक ग्रामस्थ चिडले. ज्यांना मदत मिळाली ते या गावचे नसल्याची तक्रार त्यांनी केली, असे आगा खान फाऊंडेशनचे एक स्वयंसेवक इब्राहिम यांनी सांगितले. या गरीब लोकांच्या आयुष्यातील अत्यंत भीषण अशा क्षणी आयोग असे गुन्हे का करत आहे हे कळत नाही, असेही तो म्हणाला. आता या आयोगाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था) नेत्यांनी नजीकच्या गावातील लोकांचीही नावे पीडितांच्या यादीत घुसडवली ४अबी बराक हे गाव दोन मातीच्या डोंगरांमध्ये वसलेले असून, येथील लोक शेतकरी किंवा मेंढपाळ आहेत. तेथे वीज नसून कधीही जनगणना झालेली नाही. ४त्यामुळे भूस्खलनानंतर पीडितांची यादी बनविण्यासाठी ज्येष्ठांचा एक आयोग स्थापन करण्यात आला होता. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. कारण, नेत्यांनी नजीकच्या गावातील लोकांचीही नावे पीडितांच्या यादीत घुसडवली. ४खर्या पीडितांना मदत मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मदत संघटनांनी मदत वितरित करण्याचे काम थांबवले आहे.