वॉशिंग्टन - अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांच्याकडून निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता. यातच आता डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump) व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन येथील कॅपिटल हिलमध्ये घुसखोरी केली. तसंच त्या ठिकाणी मोठी तोडफोडही केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहात सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यो बायडन हे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेणार आहेत. त्यापूर्वीच ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टन मार्च काढला आणि कॅपिटल हिलवर हल्लाबोल केला.
पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या 52 जणांना अटक केली आहे. कर्फ्यू असतानाही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच कॅपिटॉलमधील हिंसाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. गोळीबारात महिलेच्या खांद्याला गोळी लागली होती. मृतांमध्ये अजून एक महिला आणि दोन पुरुष आंदोलक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा पक्षात आहोत..
डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल बिल्डिंगबाहेर जोरदार गोंधळ
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट 12 तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे. तसेच, नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा सुद्धा ट्विटरने दिला. ट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडीओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील ट्रम्प समर्थकांमुळे 200 वर्षांनंतर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. असाच एक हल्ला इंग्रजांनी अमेरिकेच्या संसदेच्या इमारतीवर केला होता. त्यावेळी घुसखोरांनीी वॉशिंग्टनमध्ये जाळपोळही केली होती. तसंच त्यांच्याकडून संसदेच्या इमारतीला नुकसान पोहोचवण्याचाही प्रयत्न केला होता. या हिंसाचारादरम्यान पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस यांच्यावर बायडन यांना विजयाचं प्रमाणपत्र न देण्याचा दबाव आणत होते असं सांगण्यात येत आहे. सध्या संपूर्ण परिस्थितीवर ताबा मिळवण्यात आला असून कॅपिटल बिल्डींगच्या सुरक्षेसाठी नॅशनल गार्ड्सना तैनात करण्यात आलं आहे.