Imran Khan Long March : पाकिस्तानातील राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अनेक महिन्यांपासून विद्यमान सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ते त्यांच्या दुसऱ्या लाँग मार्चसाठी इस्लामाबादच्या दिशेने जात होते, पण शनिवारी त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. रावळपिंडीत मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना इम्रान खान यांनी काही अत्यंत धक्कादायक दावे केले. यावरून आता ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले असून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे.
लाँग मार्च रद्द केल्याची घोषणा करताना इम्रान म्हणाले की, त्यांचा पक्षातील नेते सर्व विधानसभांचे राजीनामे देतील. आपण या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात, इम्रान खान यांनी वजिराबादमध्ये त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते आणि त्यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. त्या दिवशी त्याच्यासोबत असलेल्या कंटेनरवर असलेल्या १२ जणांना गोळ्या लागल्याचं त्यांनी सांगितलं. सिंधचे माजी राज्यपाल इम्रान इस्माईल आणि फैसल जावेद हे पीटीआयचे ज्येष्ठ नेते हल्ल्याच्या वेळी इम्रान खान यांच्यासोबत उपस्थित होते.
… आणि इम्रान खान झाले ट्रोलसंबोधनादरम्यान इम्रान खान यांनी “चार गोळ्या इम्रान इस्माईल यांच्या कपड्यातून निघाल्या, परंतु ते बचावले,” असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. तसंच नेटकरी त्यांना यावरून ट्रोल करत आहेत. एका युझरनं त्यांचा व्हिडीओ ट्वीट करत कॉमेडी नाईट्स विथ इम्रान खान असं म्हटलंय. तर एका युझरनं खान पेन किलरच्या हाय डोसवर असल्याचं म्हटलं. अनेकांनी काही मीम्स आणि व्हिडीओसही शेअर केले आहेत.
एका युझरनं औषधाचा फोटो शेअर केला आहे. तसंच पाकिस्तानात पॅरासिटामॉलची कमतरता आहे आणि इम्रान इस्माईल चार गोळ्या कपड्यात घेऊन फिरतायत असं म्हणत खिल्ली उडवली. दरम्यान, इम्रान खान यांनी कोणत्याही प्रकारच्या अराजकतेपासून बचाव करण्यासाठी इस्लामाबादला जाणार नसल्याचं म्हटलं. तसंच लाँच मार्च संपल्याचंही म्हटलं.