इस्लामाबाद: भारताला कायम पाण्यात पाहणारा पाकिस्तान आपली लष्करी ताकद वाढवत आहे. आजच पाकिस्ताननं आपल्या हवाई दलात जे-१० सी लढाऊ विमानांचा समावेश केला. या विमानांची निर्मिती चीनमध्ये झाली. पाकिस्तानकडे Bayraktar TB2 ड्रोन असल्याचंदेखील आजचं दिसून आलं. याच ड्रोनच्या मदतीनं युक्रेनी सैन्यानं रशियन फौजांची झोप उडवली आहे.तुर्कस्तानमध्ये Bayraktar TB2 ड्रोनची निर्मिती होते. युक्रेन-रशिया युद्धापूर्वी अझरबैजान-आर्मेनिया युद्धात या ड्रोनची ताकद दिसली होती. अझरबैजाननं Bayraktar TB2 ड्रोन्सचा वापर आर्मेनियाच्या लष्कराची कंबर मोडली होती. आता पाकिस्तानकडेही हाच ड्रोन असल्याची माहिती समोर आली आहे.
चीनमध्ये तयार झालेल्या जे-१० लढाऊ विमानांचा समावेश आज पाकिस्तानच्या हवाई दलात झाला. त्यानंतर आपली हवाई ताकद दाखवण्यासाठी पाकिस्ताननं एक व्हिडीओ जारी केला. त्यात Bayraktar TB2 ड्रोन दिसले. याशिवाय तुर्कस्तानचे २ ड्रोन आधीपासूनच पाकिस्तानच्या हवाई दलाकडे आहेत.
बायकर डिफेन्स नावाची तुर्कस्तानातील कंपनी Bayraktar TB2 ड्रोनची निर्मिती करते. तुर्कस्तानचे अध्यक्ष तय्यप रेसेप एर्दोगान यांचे जावई सेलकूक बायरकतार ही कंपनी चालवतात. Bayraktar TB2 ड्रोन हलकी शस्त्रं घेऊन हवेत झेपावतं. रेडिओ गायडेड असल्यानं ३२० किमीच्या रेंजमध्ये हे ड्रोन ऑपरेट करता येतं.