कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यातून अनेकांचे रोजगार बुडाले आहेत तर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. बहुतेक जण कमी पगारात किंवा पगार मिळत नसतानाही काम करतायत अभी भीषण परिस्थितीत निर्माण झाली आहे. याचाच एक प्रत्यय आफ्रिकेतील झांबियामध्ये आला आहे. सर्वसामान्यांपर्यंत बातम्या पोहोचविण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांना देखील वेतन मिळत नसल्याचं दु:ख झांबियातील एका पत्रकारानं थेट लाइव्ह बुलेटीन सुरू असताना व्यक्त केलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. (Watch: Zambian journalist Kabinda Kalimina demands salary live on air)
आफ्रिकेतील झांबिया देशातील केबीएन वाहिनीमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम करत असलेल्या कॅलिमिना काबिंदा यांनी लाइव्ह बुलेटिनमध्येच पत्रकारांना वेतन मिळत नसल्याची खदखद व्यक्त केली. ब्रेकिंग बातमी सांगत असतानाच ते थांबले आणि लाइव्ह बुलेटिनमध्येच आपल्या वेदना सांगू लागले. "आम्हीही माणसं आहोत, मात्र आम्हाला इथं काम करूनही पगार मिळत नाहीय", अशी तक्रार त्यांनी बुलेटिनमध्ये केली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. १९ रोजी हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
नेमकं काय म्हणाले कॅलिमिना काबिंदा?कॅलिमिना काबिंदा वृत्त निवेदनाचं काम करत असतानाच मध्येच थांबून केबीएल चॅनलमध्ये काम करुनही माझ्यासह अनेक सहकाऱ्यांना पगार मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "बातम्यांपलिकडे जाऊनही आम्हीही माणसंच आहोत. आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला केबीएन टीव्हीकडून पगार दिला जात नाहीय. माझ्या सहकाऱ्यांना देखील पगार मिळालेला नाही", असं काबिंदा यांनी म्हटलं आहे. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवरही शेअर केला आहे.
फेसबुकवर व्हिडिओ शेअर करताना काबिंदा यांनी रोखठोक मत देखील व्यक्त केलं आहे. "हो मी लाइव्ह टीव्हीवर पगार मिळत नसल्याचं सांगितलं आहे. कारण अनेक पत्रकार यावर बोलण्यास घाबरतात. याचा अर्थ पत्रकारांनी यावर बोलायचं नाही असं होत नाही", असं काबिंदा यांनी म्हटलंय.