गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या अती मुसळधार पावसामुळे निम्मा पाकिस्तान पुराच्या पाण्याखाली बुडाला आहे. महागाईच्या गर्तेत अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी भारतापुढे हात कसे पसरायचे या विवंचनेत तेथील राज्यकर्ते असताना पाकिस्तानवर आता एका मोठ्या वॉटर बॉम्बचे संकट घोंघाऊ लागले आहे.
पाकिस्तानमध्ये जवळपास साडेतीन कोटी लोक विस्थापित झाले आहेत. असे असताना नासाने एक मोठा धोका दाखवून दिला आहे. यामुळे सुमारे लाखभर लोकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा मंछर तलावावरील बांध फुटण्याच्या अवस्थेत आहे. या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजू मातीपासून तुटल्या आहेत. यामुळे जर हा बंधारा फुटला तर लाखो लोकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे.
पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १३०० लोकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाच्या लँडसेट ८ आणि ९ या दोन सॅटेलाईटनी या मंछर लेकचे फोटो काढले आहेत. हा तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरून वाहू लागला आहे. या तलावाचे बंधारे कोनातून फुटले आहेत. सिंधू नदीच्या पठारावर दाटीवाटीने लोकवस्ती आहे. हा तलाव फुटला तर या लोकवस्तीत पाणी घुसणार आहे. या लोकवस्तीत तलावाचे पाणी जाण्यापासून वाचविण्यासाठी हे बंधारे बांधण्यात आले होते, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. नासाने २८ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबरचे फोटो जारी केले आहेत. खोऱ्यात पसरलेल्या शेकडो गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे 100,000 लोकांना पुराचा धोका आहे. पाकिस्तानात आलेला पूर हा गेल्या १० वर्षांतील मोठे संकट असल्याचे म्हटले जात आहे. मृतांचा आकडा आणि हजारो जखमींची संख्या सातत्याने वाढत आहे. 10 लाखांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाकिस्तानमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे होणारे आर्थिक नुकसान 15 अब्ज डॉलर्स ते 20 अब्ज डॉलर्स एवढे असू शकते.
या प्रदेशात या वर्षी आतापर्यंत सरासरी वार्षिक पावसाच्या पाचपट जास्त पाऊस झाला आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता ब्रिटनच्या हवामान खात्याने वर्तवली आहे, असे नासाने म्हटले आहे. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी सरकारने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. अन्न, पाणी, आरोग्य उपकरणे आणि मदतीसाठी आंतरराष्ट्रीय संघटनांना आवाहन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी पाकिस्तानमधील पुरामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी 160 दशलक्ष डॉलर्सची आपत्कालीन मदत देण्याची घोषणा केली आहे.