इराणमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागत असल्याची घटना समोर आली आहे. मोठं जलसंकट ओढावलं असून लोकं रस्त्यावर उतरले आहेत. पाण्याच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांकडून कारवाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहे. आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला आहे. इराण सरकारने याबाबत अधिक सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र पाश्चिमात्य देशांमधील माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे.
पाण्यावरून झालेल्या आंदोलनादरम्यान काही जणांचा मृत्यू झाला. मृत्यूबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी या मृत्यूला सुरक्षा दलाचे जवान जबाबदार नाहीत. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात एका व्यक्तीने गोळीबार केला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असं म्हटलं आहे. तसेच ही घटना अलीगूरदर्ज या ठिकाणी झाली. इराण सरकारविरोधी गटांची वृत्तसंस्था ह्युमन राइट्स एक्टिविस्ट्स वृत्त संस्थेच्या हवाल्याने पाश्चिमात्य माध्यमांनी दहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. तर 31 आंदोलकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पाणीटंचाईविरोधात गेल्या आठवड्यात पश्चिम प्रांतातील लोरस्तान येथे आंदोलनाची सुरुवात झाली.
वृत्तांनुसार, इराणमधील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेती, घरगुती वापरासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच विजेची मागणी देखील वाढली आहे. अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने इराणच्या गोपनीय सूत्रांच्या माहिती आधारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अलीगूरदर्जमध्ये झालेल्या घटनेत मृतांची संख्या अधिक आहे. सरकारी माध्यमांनी कमी संख्या सांगितली आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. हा गोळीबार पोलिसांनी केला असल्याचा दावा देखील वृत्तात करण्यात आला आहे. अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणची अर्थव्यवस्था सध्या संकटात सापडली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने तेल निर्यातीवर लावलेल्या निर्बंधामुळे विशेषत: 2018 मध्ये इराणचे मोठे नुकसान झाले.
कोरोना आजारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. देशात सध्या बेरोजगारीचा दर खूपच जास्त आहे, तर महागाईचा दर 50 टक्क्यांहून अधिक आहे. त्याचा सामान्यांच्या जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशातील विविध गट रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सोशल मीडियावर पाणी टंचाईविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचे समोर आले. वाढत्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.