कोरोनानंतर अर्थव्यवस्थेत खस्ता खात असेलल्या चीनला दुसऱ्या देशांना लष्करी ताकदीने जेरीस आणण्याच्या मोहिमेवर मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षीपासून चीनचे संरक्षण मंत्री, बडे बडे अधिकारी गायब होऊ लागले आहेत. चीनला भ्रष्टाचाराने एवढे पोखरलेय की चीन पुढची काही वर्षे युद्धाचा साधा विचारही करू शकत नाहीय. अमेरिकेच्या इंटेलिजन्सने याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी कमजोर पडू लागली आहे. त्यांचे शक्तीशाली जनरल एका मागोमाग एक गायब होऊ लागले आहेत. काहींना तर कामावरून बाजुला करण्यात आले आहे. यामागे काहीही कारण देण्यात आलेले नाहीय. सैन्यातील भ्रष्टाचारामुळे चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सैन्याच्या अत्याधुनुकीकरणाला धक्का बसला आहे.
अमेरिकेच्या माहितीनुसार चीनच्या सैन्यात एवढा भ्रष्टाचार वाढलाय की सैन्याचा आत्मविश्वास कमी झाला आहे. रॉकेट फोर्समध्ये जिनपिंग यांचे मनसुबे कित्येक काळासाठी मागे पडले आहेत. गेल्या सहा महिन्यात एक डझनाहून अधिक अधिकारी अडकले आहेत. असे असले तरी जिनपिंग यांची अद्यापही कम्युनिस्ट पक्षावर मजबूत पकड आहे. सैन्यात एवढी सफाई करूनही ते युद्धासाठी तयार करणे आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी गंभीर आहेत.
व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनने अमेरिकन गुप्तचर माहितीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शी जिनपिंग यांनी 2027 पर्यंत सैन्याला आधुनिक दलात रूपांतरित करण्याच्या त्यांच्या ध्येयासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्याच्या केंद्रस्थानी रॉकेट फोर्स होते, जे तैवानवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चीनसाठी महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काही महिन्यांत जिनपिंग यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे. 29 डिसेंबर रोजी चीनने क्षेपणास्त्र दलाशी संबंधित पाच जणांसह नऊ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना काढून टाकले.