न्यू यॉर्क- आपल्या मानसिक स्वास्थ्यावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. तापमान, दैनंदिन नातावरणातील बदलांप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष हेसुद्धा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे कारण असू शकते असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील गेल्या २० वर्षांच्या दुष्काळामुळे कोलोरॅडो नदीमधील पाण्याची पातळी खालावली आहे. ही नदी सात राज्यांमधील ४ कोटी लोकांना पाणी पुरवते. मात्र प्रत्येक राज्याला ठरवल्याप्रमाणे २०२० पर्यंत पाणीवाटप होण्याची केवळ ५७ टक्के इतकीच शक्यता आहे असा अंदाज कोलोरॅडो पब्लिक रेडिओने जाहीर केलेल्या वृत्तात म्हटले आहे. नासाने २०१७ साली तापमानवृद्धीमुळे अशा प्रकारचे दुष्काळ वारंवार आणि सलग येण्याची शक्यता वर्तवली होती. पण या दुष्काळाचे परिणाम प्रत्येक माणसावरही होत असतात. पाण्याच्या टंचाईमुळे मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि चिंताही वाढते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कॅलिफोर्नियातील सार्वजनिक आरोग्याच्या सर्वेक्षणामध्ये दुष्काळग्रस्त सेंट्रल व्हॅलीमधील रहिवाशांनी दुष्काळामुळे त्यांची मानसिक शांतता हरपली तसेच काही लोकांमध्ये चिडचिडेपणा आणि निद्रानाशाचा त्रास झाला असाही अनुभव नोंदवला. बोलिवियामधील पाणीटंचाईचा अभ्यास केल्यावर निरीक्षकांना दुष्काळाचा गरिब आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या मनावर जास्त परिणाम होत असल्याचे दिसून आले. २०१५ साली दुष्काळाच्या ८२ अभ्यासांचे मेटा-अनालसिस करण्यात आले होते. त्यामध्ये दुष्काळामुळे येणाऱ्या आर्थिक संकटांमुळे ताणतणावात वाढ होते आणि सामाजिक एकटेपण येतं असं दिसलं. यामध्ये नैराश्य, चिंता, आत्महत्या या सर्व परिणामांचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियामधील सात वर्षांच्या दुष्काळाचा अभ्यास केल्यानंतर ग्रामिण जनतेच्या त्रासामध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले मात्र शहरी लोकांवर परिणाम झाला नसल्याचे आढळले. दुष्काळामुळे पिके नष्ट होणे आणि मनुष्य उपयोगी जनावरांच्या संख्येवर परिणाम होतो त्यामुळे त्रासामध्ये भर पडते असे आॅस्ट्रेलियाच्या सर्वेक्षणाबाबत संशोधकांनी मत व्यक्त केले.दुषित पाण्याच्या बाबतीतही अशाच प्रकारचा अनुभव संशोधकांना आला. २०१६ साली फ्लिंट आणि मिशिगन येथे केलेल्या अभ्यासामध्ये रहिवाशांनी तणाव, चिंता, नैराश्य वाढल्याचे मत व्यक्त केले. आॅस्ट्रेलियातील आग्नेय भागामध्ये १९९७ ते २००१ या काळामध्ये पडलेल्या दुष्काळाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये दुष्काळपीडित ६६४ शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या शेतकऱ्यांच्या मनावर दुष्काळाचा जास्त परिणाम होत असल्याचे दिसून आले. हा अभ्यास मेडिकल जर्नल आॅफ आॅस्ट्रेलियामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
दुष्काळामुळे बिघडते मानसिक स्वास्थ्य; तज्ज्ञांनी मांडले निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:14 PM