ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २० - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला लष्करी कारवाईव्दारे उत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानातही लष्करी अधिका-यांच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांनी कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत असे म्हटले आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या तयारीवर त्यांनी सोमवारी समाधान व्यक्त केले. सध्याची प्रादेशिक स्थिती आणि त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवर काय परिणाम होऊ शकतो याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे असे शरीफ यांनी म्हटले आहे.
सध्या घडणा-या प्रत्येक घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असे रावळपिंडीमध्ये कॉर्पस कमांडर्सच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे धोके आहेत त्यांना उत्तर देण्यास पाकिस्तानी लष्कर पूर्ण सज्ज आहे असे शरीफ यांनी म्हटले आहे.