कीव्ह : पूर्व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आम्ही रशियाच्या लष्कराचा पराभव केला आहे, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी शुक्रवारी केला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला, त्यावेळी हे वक्तव्य केले.
जेलेन्स्की म्हणाले की, रशियाचे लष्कर कोणाचाही काही दिवसांतच पराभव करू शकते असे म्हटले जात होते. मात्र, युक्रेनने ही गोष्ट खोटी असल्याचे सिद्ध केले आहे. डोनेत्स्कमधील सर्वांत मोठे रेल्वे हब, तसेच दोन प्रमुख शहरे अजूनही युक्रेनच्या ताब्यात आहेत.
लिमन, सिव्हिएरोडोनेत्स्क या दोन शहरांवर आपण कब्जा करू असे रशियाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. त्यांनी सांगितले की, रशिया संपूर्ण युक्रेनवरच ताबा मिळविण्याच्या प्रयत्नांत आहे; पण आम्ही तसे कधीच होऊ देणार नाही. स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून आम्ही जिवाची बाजी लावून लढा देत आहोत.
लहान शहरे ताब्यात घेण्याची रणनीती
पूर्व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लढाईत लहान शहरे ताब्यात घेण्याची रणनीती रशियाने आखली आहे. लिमन हे शहर जिंकल्याचा दावा रशियाने केला. मात्र, तो युक्रेनने खोडून काढला आहे. सिव्हिएरोडोनेत्स्क शहरही आम्ही काही दिवसांत ताब्यात घेऊ, असे रशियाने म्हटले आहे. डोनेत्स्क, लुहान्समधील शहरे जिंकल्यानंतर डोनबास हा भागावर नियंत्रण प्रस्थापित होईल असा हिशेब रशियाने मांडला आहे.
इंधनासाठी रशियाला नॉर्वे पर्याय?
रशियाऐवजी नॉर्वेकडून इंधन, नैसर्गिक वायू खरेदी करण्याचे धोरण युरोपमधील काही देशांनी स्वीकारले आहे. त्यामुळे नॉर्वेतील इंधन निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियाकडून इंधन, नैसर्गिक वायू घ्यायचा नाही असा एक मतप्रवाह पाश्चिमात्य देशांमध्ये आहे. नॉर्वे हा युरोपमधील नैसर्गिक वायूचा दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. युक्रेन युद्धाचा फायदा घेऊन प्रचंड नफा कमावत असल्याच्या आरोपाचा नॉर्वेने इन्कार केला आहे.