संयुक्त राष्ट्रे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणले की, जे लोक अमेरिकेविरोधात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्याकडे अमेरिका कट्टर शत्रू म्हणून पाहील. अमेरिका आता तो देश राहिलेला नाही ज्याच्यावर ११ सप्टेंबर २००१ रोजी हल्ला झाला होता. आज आम्ही आधीपेक्षा कितीतरी शक्तिशाली झालो आहोत. तसेच दहशतवादाचे आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत. ("We do not want another Cold War," Biden said at the UN General Assembly )
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिका दहशतवादाविरोधात आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे रक्षण करत राहील. ते म्हणाले की, अजून एक शीतयुद्ध व्हावे, ज्यामुळे जगाचे दोन गटात विभाजन होईल, अशी आमची इच्छा नाही. शांततापूर्ण मार्गाचे अनुसरण करण्यास इच्छूक असलेल्या कुठल्याही देशासोबत काम करण्यास तयार आहे. कारण आपण सर्वांनी अपयशाचे परिणाम भोगलेले आहेत.
यावेळी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावण्याच्या निर्णयाबाबतही बायडन यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, आज आपण दहशतवादाच्या धोक्याचा सामना करत आहोत. आम्ही अफगाणिस्तानमध्ये २० वर्षे सुरू असलेला संघर्ष थांबवला आहे. आम्ही मुत्सद्देगिरीचे दरवाजे उघडले आहेत. आमची सुरक्षा, समृद्धी, स्वतंत्रता आपसात जोडली गेलेली आहे. आपण सर्वांना आधीप्रमाणे जगातील सर्व आव्हानांविरोधात एकत्र येऊन काम केले पाहिजे.
जो बायडन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये आपल्या पहिल्या भाषणाची सुरुवात कोविड-१९ मुळे जगासमोर निर्माण झालेले आव्हान आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा उल्लेख करून केली. तसेच त्यांनी सर्वांना जागतिक हवामानातील बदलांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले.