Israel-Hamas War: गेल्या महिन्याभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 'आम्हाला गाझा पुन्हा ताब्यात घ्यायचा नाही. त्याऐवजी आम्हाला मध्य पूर्वेला एक चांगले भविष्य द्यायचे आहे,' असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, आम्हाला गाझावर ताबा मिळवायचा नाही. आम्हाला गाझावर राज्यही करायचे नाही. त्यापेक्षा आम्हाला गाझाला एक चांगले भविष्य द्यायचे आहे. गाझामध्ये आमचे सैन्य उत्कृष्ट काम करत आहे. गाझात लपलेल्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी तिथे एक विश्वासार्ह शक्ती असणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वीच नेतन्याहू म्हणाले होते की, हमाससोबतचे युद्ध संपल्यानंतर इस्रायल गाझाच्या सुरक्षेची जबाबदारी घेईल. अनेकांनी याला गाझा ताब्यात घेण्याचा इस्रायलचा हेतू असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर हे युद्ध संपल्यानंतर इस्रायलने गाझावर कब्जा केला, तर त्याला विरोध केला जाईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. अशा स्थितीत नेतान्याहूंच्या या वक्तव्यावरुन त्यांची वृत्ती मवाळ होत असल्याचे दिसून येत आहे.