सिंगापूर : आमचे वडील आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना मी आणि माझी बहिण प्रियंका यांनी पूर्णपणे माफ केले आहे, असं भावनिक विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सिंगापूरमध्ये केलं आहे. 1991 साली श्रीपेरूंबदुर इथे 21मेला राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सिंगापूर भेटीत तेथे राहणा-या ‘इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम) माजी विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी केल्या. काँग्रेस पक्षाने त्या संभाषणाचा व्हिडिओ त्यांच्या टिष्ट्वटर हॅण्डलवर शेअर केला. त्यानुसार, तुमच्या वडिलांच्या मारेक-यांना तुम्ही भावंडांनी माफ केले आहे का, असे एका श्रोत्याने विचारले तेव्हा राहुल गांधी यांनी वरील प्रतिपादन केले.
राहुल गांधी म्हणाले की, राजकारणात तुम्ही परखड भूमिका घेतली तर तुम्हाला मृत्यूसाठी तयार रहावं लागतं. कोणीही केलेला हिंसाचार मी जेव्हा पाहतो तेव्हा मला त्या मागचा माणूस दिसतो. तो हिंसाचार करणा-याचे कुटुंब, आक्रोश करणारी मुलेबाळे माझ्या डोळ्यापुढे येतात. हे सर्व समजायला मला खूप मानसिक त्रास सोसावा लागला. पण यातून मला जी जाणीव झाली ती मी बहुमूल्य मानतो. मला माणसांचा द्वेष करायला जमत नाही. माझ्या बहिणीचेही तसेच आहे.
श्रीलंकेतील तामिळ निर्वासितांच्या बाबतीत जी भूमिका राजीव गांधींनी घेतली होती त्यामुळे एलटीटीईच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची हत्या केली होती. एलटीटीईचा म्होरक्या प्रभाकरनचाही खात्मा झाला असून राजीव गांधींच्या हत्येचे सूत्रधारही गेले अनेक वर्ष कैदेत शिक्षा भोगत आहे. दोन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने त्यांना 21 वर्ष जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण त्याहून कितीतरी अधिक काळ त्यांनी कैदेत काढल्यामुळे त्यांच्या सुटकेला जयललिता हिरवा कंदील दिला होता.पण तेव्हाच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या सुटकेला विरोध केला होता.