इराणची राजधारनी तेहरानमध्ये आपणच माजी हमासप्रमुख इस्माइल हानियेहचा खात्मा केल्याचे इस्रायलने स्वीकारले आहे. याच बरोबर, आपण येमेन मधील हुती बंडखोरांचे नेतृत्वही नष्ट करणार असल्याचा इशारादेखील इस्रायलने मंगळवारी (24 डिसेंबर) दिला.
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, "आपण हुतींवर मोठा प्रहार करणार आहोत आणि त्यांचे नेतृत्व नष्ट करणार आहोत. जसे आम्ही, तेहरान, गाझा आणि लेबनानमध्ये हनियेह (याह्या), सिनवार आणि (हसन) नसरल्लाहसोबत केले. आम्ही होदेदा आणि सनामध्येही असेच करणार आहोत, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, "या पुढेही जो कुणी इस्रायलविरोधात हात उचलेला,त्याचा हात धडावेगळा केला जाईल," असेही इस्रायली संरक्षणमंत्री काट्झ यांनी म्हटले आहे.
गेल्या 31 जुलैला हनियेह मारला गेला होता. यानंतर जवळपास 5 महिन्यांनी इस्रायलने हनियेहच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारने यापूर्वी कधीही हनियेहच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली नव्हती. मात्र, हमास आणि इराण इस्रायलला सातत्याने दोषी मानत होता.
कशी झाली इस्माइल हानियेहची हत्या -तेहरानमध्ये 31 जुलैला एका गेस्टहाऊसमध्ये एका स्फोटात हनियेहचा मृत्यू झाला होता. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्या उद्घाटन समारंभात हनीयेहच्या आगमनाच्या काही आठवडे आधी इस्रायलने स्फोटके ठेवली होती. दरम्यान, हनियेहला त्याच्या निवासस्थानाबाहेरून सोडण्यात आलेल्या "कमी पल्ल्याच्या प्रोजेक्टाइल"ने मारण्यात आल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने केला होता. तसेच, इस्त्रायलच्या कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचा आरोप तेहरानने केला होता.