इस्लामाबाद - आर बल्की दिग्दर्शित 'पॅडमॅन' चित्रपट 9 फेब्रुवारीला संपुर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून राधिका आपटे आणि सोनम कपूरदेखील महत्वाची भूमिका निभावत आहेत. हा चित्रपट ख-या गोष्टीवर आधारित आहे. चित्रपटावर मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनवर खुलेपणाने भाष्य करण्यात आलं आहे. एकीकडे भारतात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट आपल्या परंपरा आणि संस्कृतीविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बोर्डाचे सदस्य इशाक अहमद यांनी म्हटलं आहे की, 'पाकिस्तानात अशा प्रकारचा चित्रपट रिलीज करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. हा चित्रपट आपली संस्कृती आणि परंपरेच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या वितरकांना हा प्रदर्शित करण्यासंबंधी कसं काय सांगू शकतो'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'हा एका अशा विषयावरील चित्रपट आहे ज्याच्यावर जास्त भाष्य केलं जात नाही. आपल्या संस्कृती, समाज आणि धर्मातही अशा गोष्टींसाठी जागा नाही'.
'पॅडमॅन' चित्रपटावर बंदी घातल्याने पाकिस्तानमधील महिलांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. महिलांनी फेडरल सेन्सॉर बोर्डावर टीका केली असून, आम्हालाही मासिक पाळी येते अशा शब्दांत सुनावलं आहे. तेथील महिलांनी सोशल मीडियावर एक मोहीमच उघडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी महिला मासिक पाळीवर भाष्य करत आहेत. चित्रपटावर लावण्यात आलेली बंदी उठवण्यात यावी असं महिलांनी सेन्सॉर बोर्डाला सांगितलं आहे. सोशल मीडियावर महिलांनी सुरु केलेल्या या मोहिमेला अनेक पुरुषांनी समर्थन दिलं आहे.
'चीनी कम', 'पा', 'शमिताभ', 'की अँड का' यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केल्यानंतर आता आर. बाल्की यांचा पॅडमॅन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आर. बाल्की यांनी केवळ मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून एक सिनेमाच नाही बनवला तर याद्वारे महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमाची कहाणी अरुणाचलम मुरुगनंथम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुरुगनंथम यांना जगभरात पॅडमॅन नावानं ओळखलं जातं. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं सिनेमामध्ये मुरुगनंथम यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान, पॅडमॅन सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार होता, मात्र याच दिवशी संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा रिलीज झाल्यानं पॅडमॅनची रिलीजची तारीख 9 फेब्रुवारी करण्यात आली.