न्यूयॉर्क: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. मोदी दहशतवादाच्या समस्येचा व्यवस्थित सामना करतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयनं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याची खळबळजनक कबुली इम्रान खान यांनी काल दिली. त्यावरुन ट्रम्प यांना पाकपुरस्कृत दहशतवादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर यामध्ये पंतप्रधान मोदी लक्ष घालतील. आम्ही दोन देश मिळून याचा सामना करू, असं ट्रम्प म्हणाले. इस्लामिक दहशतवादाची समस्या दोन्ही देश एकत्र येऊन सोडवतील. दहशतवादाच्या मुद्द्यावर मोदींशी अतिशय मोकळेपणानं चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं ट्रम्प काल म्हणाले होते. मात्र आज एक पाऊल मागे जात पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांनी हा प्रश्न सोडवल्यास ते उत्तम होईल, असा पवित्रा ट्रम्प यांनी घेतला. काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याची ठाम भूमिका भारतानं घेतल्यानं ट्रम्प यांनी सावध पवित्रा घेतल्याचं बोललं जात आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक करत त्यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हटलं. त्यांनी मोदींची तुलना अमेरिकन गायक आणि अभिनेते एल्विस प्रेस्लीसोबत केली. मोदी भारतात एल्विस प्रेस्लीसारखे लोकप्रिय आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींनी दहशतवादाबद्दल घेतलेल्या भूमिकेचीही ट्रम्प यांनी प्रशंसा केली. दहशतवादाबद्दलची मोदींची भूमिका अतिशय कठोर होती आणि त्यांनी ती अतिशय स्पष्टपणे मांडली, असं ट्रम्प म्हणाले.