उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाच्या मदतीसाठी आपले हजारो सैनिक पाठवले आहेत. यामुळे अमेरिका प्रचंड भडकला आहे. 'रशियासोबत युक्रेन युद्धात उतरणाऱ्या उत्तर कोरियाच्या सैनिकांचे मृतदेह बॅगेत भरून परत पाठवू,' असा थेट इशारा संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या उप राजदूताने बुधवारी किम जोंग उनला दिला आहे.
अमेरिकेचे रॉबर्ट वुड यांनी सुरक्षा परिषदेला प्रश्न केला आहे की, "डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाच्या (उत्तर कोरिया) सैन्याने रशियाच्या समर्थनार्थ युक्रेनमध्ये प्रवेश करणे योग्य आहे का? मला त्यांना सांगायचे आहे की, केवळ त्यांचे मृतदेहच त्यांच्या देशात परततील. किम यांनी अशा प्रकारच्या अविचारी आणि धोकादायक कृत्यात सहभागी होताना दोन वेळा विचार करायला हवा, असा सल्ला मी त्यांना देईन, असेही वुड यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियामुळे युद्ध अधिक भडकेल -अमेरिकेच संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी बुधवारी म्हटले आहे की, "युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला मदत केल्याने युद्ध अधिक तीव्र होईल. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धाला आणखी चालना मिळेल. पूर्व रशियामध्ये उत्तर कोरियाचे सुमारे 10,000 सैन्य आधीच तैनात आहे, त्यांच्या हातात रशियन उपकरणे आहेत." याशिवाय, अमेरिकेने या युद्धात उत्तर कोरियाच्या एन्ट्रीवरून चिंता व्यक्त केली आहे.
उत्तर कोरिया आणि रशियाचे संबंध -नॉर्थ कोरिया आणि रशियाचे संबंध युद्धापासून अधिक मधुर झाले आहेत. या काळात दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी एकमेकांच्या देशांचे दौरेही केले आहेत. याशिवाय, उत्तर कोरियाने रशियाला शस्त्रास्त्रेही दिली आहेत. ज्यांचा वापर रशियन सैनिकांनी युक्रेन युद्धातही मोठ्या प्रमाणावर केला आहे.