जकार्ता : तुम्ही मोठे असा की लहान फास्टफूड सर्वांच्याच आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळेच डॉक्टर्स त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मात्र, फास्टफूडच्या चवीमुळे बच्चेकंपनी त्याकडे आकर्षित होते. कधीतरी खाणे वेगळे; मात्र मुलांना याची सवय जडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आर्य मोसंत्री या इंडोनेशियन मुलासारखी त्यांची अवस्था होऊ शकते. नूडल्स आणि शीतपेयाच्या सवयीमुळे दहा वर्षांच्या आर्यचे वजन तब्बल २०० किलो झाले आहे. वजनामुळे त्याला ना शाळेत जाता येत ना तो धडपणे दोन पावले टाकू शकतो. सतत वजन वाढत असल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतरही त्याचे वजन सामान्य मुलांच्या तुलनेत खूप अधिक आहे. आर्य दिवसातून पाच वेळा जेवण करतो. कोकाकोलासह इंस्टेंट नूडल्स, भात, मांस आणि मासे असा त्याचा आहार आहे. आर्यचे वडील शेतकरी आहे. एवढे जेवण घेतल्यानंतरही आर्यला खूप भूक लागते, असे त्यांनी सांगितले. आर्यला डॉक्टरला दाखविल्यानंतर त्याचे वजन पाहून तेही थक्क झाले. डॉक्टरांनी मांसाहार सोडून इतर पदार्थ देण्यास सांगितले. मात्र, त्यामुळेही त्याच्या वजनावर परिणाम झाला नाही. अखेरीस डॉक्टरांना त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. माझा मुलगा तीन माणसांएवढा आहार घेतो, असे आर्यची आई रकैया यांनी सांगितले. आर्यवर १७ एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याचे केवळ नऊ किलोच वजन कमी झाले. शस्ज्ञक्रियेला दोन महिने उलटल्यानंतर मात्र आर्यचे वजन आणखी १६ किलोंनी कमी झाले.
नूडल्स अन् शीतपेयाच्या सवयीमुळे वजन झाले २०० किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 4:16 AM