‘दैवं देतं आणि कर्म नेतं...’ ही म्हण आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. दैवानं मिळालेलं आपल्या कर्मानं कसं जातं, याचा अनुभव आपण स्वत: कधीतरी घेतला असेल किंवा आपल्या जवळच्या लोकांबाबत असं घडतानाही कधी पाहिलं असेल... असं घडल्यावर किती हळहळ होते आणि किती जीव जातो, स्वत:वरच जळफळाट होतो, हे नव्यानं सांगायला नको.याच म्हणीचा तंतोतंत अनुभव अमेरिकेतील एका पायलटला सध्या येतो आहे. कोणाच्याही आयुष्यात अगदी क्वचितच येणारी अपूर्व संधी या पायलटला आपल्या कर्मानं गमवावी लागली आहे. अमेरिकेच्या या पायलटचं नाव आहे काईल हिप्पचेन. ही कहाणीही मोठी रोचक आहे.‘स्पेस एक्स’ या संस्थेचे संस्थापक एलन मस्क यांनी गेल्यावर्षी १५ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वसामान्य पर्यटक असलेली जगातील पहिली अंतरिक्ष मोहीम आखली होती. यात कोणीही अंतराळतज्ज्ञ नव्हते किंवा कोणालाच अंतरिक्षाचा अनुभव नव्हता. केवळ अंतराळ पर्यटकांसाठी आखलेली ही मोहीम होती. हजारो लोक त्यासाठी इच्छुक होते आणि त्यासाठी त्यांनी आपली नावनोंदणीही केली होती. अर्थातच यातल्या काही मोजक्याच लोकांना ‘पर्यटक’ म्हणून अंतराळात जाण्याची संधी मिळणार होती. त्यासाठी एलन मस्क यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये एक ‘लकी ड्राॅ’ ठेवला होता. त्यातील विजेत्याला या अंतराळ प्रवासासाठीचं तिकीट मिळणार होतं. यासाठी काईल हिप्पचेन आणि त्याचा एक वर्गमित्र, जानी दोस्त क्रिस सिम्ब्रॉस्की या दोघांनी नोंदणी केली होती. अर्थातच यात आपला नंबर लागणार नाही, याची त्या दोघांनाही खात्री होती; पण काईलचं नशीब बलवत्तर होतं. ७२ हजार लोकांमधून काढलेल्या या ड्रॉमध्ये तो विजेता ठरला! अर्थातच अंतराळात जाण्याची संधी त्याला मिळणार होती. आपण विजेता ठरलोय, हे जेव्हा काईलला कळलं, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अंतराळात जाण्याचं त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं; पण आपलं हे स्वप्न, स्वप्नच राहणार याविषयी त्याच्या मनात यत्किंचितही शंका नव्हती. हे स्वप्न आता पूर्ण होणार हे समजल्यावर त्याला हर्षवायू व्हायचा तेवढा बाकी राहिला; पण हाय रे दुर्दैव!अंतराळात जाण्यासाठी स्पेस एक्सनं काही नियम तयार केले होते. त्यातला एक नियम काईलच्या आड आला. तो नियम होता, वजनाचा! अंतरिक्षाची सफर करण्यासाठी ज्यांची निवड होईल त्यांचं वजन २५० पाउंड (सुमारे ११३ किलो) यापेक्षा अधिक नको! काईलचं दुर्दैव इथंच आड आलं. ज्यावेळी त्याची निवड झाली, त्यावेळी त्याचं वजन होतं तब्बल ३३० पाउंड (साधारण १५० किलो)! त्यामुळं काईलची संधी हातची हुकली. दैव देतं; पण कर्म नेतं ते असं!काईल म्हणतो, कित्येक महिने मी यातून सावरू शकलो नाही. माझ्या नशिबाला, मला स्वत:ला आणि माझ्या वजनाला मी कोसत राहिलो. इतकी आनंदाची गोष्ट; पण मी ती कोणाला सांगूही शकलो नाही. सांगू तरी कोणत्या तोंडानं? अंतराळ प्रवासासाठी माझी निवड झाली; पण अवाढव्य वजनामुळं मला ही संधी नाकारण्यात आली. कसं सांगणार हे? किती अपमानास्पद होतं हे... आज इतक्या महिन्यांनी ही गोष्ट मी सर्वांसमोर उघड करतो आहे...काईलची संधी तर हुकली; पण त्याचा दिलदारपणा आणि यारानाही मोठा. आपल्याला जे तिकीट मिळालं होतं, ते त्यानं आपला वर्गमित्र क्रिस सिम्ब्रॉस्की याला दिलं. काईल आणि क्रिस हे दोघंही १९९० मध्ये एकत्रच शिकत होते. एम्ब्रे रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीत शिकत असताना रूममेट होते. अंतरिक्षाचं त्यांना खूपच आकर्षण. त्यामुळं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि जेव्हा केव्हा नासाचं यान अवकाशात सुटणार असेल, त्या प्रत्येक वेळी ते कारनं तिथं पोहोचायचे आणि तिथलं अद्भुत दृश्य डोळ्यांत साठवून ठेवायचे. हिप्पचेनला अंतराळ कक्षेतून पृथ्वी पाहण्याची संधी तर मिळाली नाही; परंतु क्रिसच्या फ्लाइटदरम्यान शून्य गुरुत्वाकर्षणाच्या एका विशेष विमानात वजनरहित अवस्थेचा सुमारे दहा मिनिटे अनुभव त्याला देण्यात आला. काईलला स्वत:ला तर अंतराळात जाता आलं नाही; पण आपला दोस्त क्रिसच्या अंतराळ उड्डाणाचा प्रसंग त्यानं प्रेक्षक गॅलरीतून पाहिला. त्यावेळी दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते... क्रिस म्हणतो, माझ्या या मित्राचे आभार कुठल्या शब्दांत मानावेत हेच मला कळत नाही. काईलसारखा दोस्त मिळणं खरोखरच देवदुर्लभ. क्रिसही मग आपल्या या दोस्ताप्रति कृतज्ञता म्हणून त्याच्या अनेक वस्तू अंतराळात घेऊन गेला...
डोळ्यांतले अश्रू आणि गळ्यातले कढ! स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये चढण्यापूर्वी लाँच टॉवरवरील फोनचा काही मिनिटांसाठी एकदा वापर करण्याची मुभा प्रत्येक प्रवाशाला देण्यात येते. आपल्या जवळच्या कोणाही व्यक्तीला तिथून फोन करता येतो. क्रिसनंही कॉल केला तो काईललाच. डोळ्यांतले अश्रू घळाघळा वाहू देत, गळ्यातील कढ आवरत तो कसाबसा बोलला, ‘यार काईल, मी आयुष्यभरासाठी तुझा ऋणी आहे...’ त्यानंतर कुणीच काही बोलू शकलं नाही...