वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर कमला हॅरिस यांनी २०२० मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे त्या देशात स्थायिक भारतीयांनी जोरदार स्वागत केले आहे. त्या अध्यक्ष झाल्या, तर तो आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.कमला हॅरिस यांनी सोमवारी आपल्या प्रचाराच्या मोहिमेला सुरुवात केली. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२० मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा उभे राहणार आहेत. त्यांच्या विरोधात हॅरिस रिंगणात उतरल्या आहेत.अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योगपती एम. आर. रंगास्वामी यांनी सांगितले की, कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास सज्ज झाल्या हा ऐतिहासिक क्षण आहे.राजकारण्यांनी अमेरिकेतील भारतीय वंशीय लोकांना कधीही गृहित धरू नये. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तुलसी गबार्ड यादेखील इच्छुक असून, त्यांनाही बरेचजण पाठिंबा देत आहेत.हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये निवडून आलेल्या पहिल्या हिंदू सदस्य, अशी तुलसी यांची ओळखआहे. (वृत्तसंस्था)>आई तामिळनाडूचीकमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षातील फिमेल बराक ओबामा म्हटले जाते. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या उमेदवारांना मदत करणाऱ्या इंडियन-अमेरिकन इम्पॅक्ट फंड या संस्थेने कमला हॅरिस यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. कॅलिफोर्नियातील सिनेटर कमला यांची आई श्यामला गोपालन मूळच्या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्या अमेरिकेमध्ये उच्चशिक्षणासाठी आल्या होत्या. अमेरिकेतील नेवाडा, कॅलिफोर्निया, व्हर्जिनिया येथे आशियाई नागरिक मोठ्या संख्येने राहातात. त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी कमला हॅरिस आपल्या प्रचारमोहिमेत खास प्रयत्न करणार आहेत.
भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:15 AM