वॉशिंग्टन : भारतात धार्मिकतेच्या आधारावर हिंसा खपवून घेतली जाणार नसून सर्व धर्मांना समान सन्मानाची वागणूक मिळेल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वागत केले आहे.व्हाईट हाऊसच्या संकेतस्थळावर एका आॅनलाईन याचिकेच्या उत्तरात याबाबतचा मजकूर टाकण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, धार्मिक हिंसाचाराचा मोदी यांनी १७ फेब्रुवारी रोजी निषेध केला असून, सर्वधर्मीयांना समान वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही दिली होती, त्याचे ओबामांनी स्वागत केले आहे. न्यूयॉर्क येथील संघटन शीख फॉर जस्टिस (एसएफजे)ने एक आॅनलाईन याचिका दाखल केली आहे. ओबामा यांच्या दौऱ्याआधी ही याचिका दाखल करण्यात आली.धर्माच्या आधारावर मतभेद झाले नाही तर भारत अभेद्य आहे, असे ओबामांनी त्याही वेळी म्हटले होते, याची आठवण व्हाईट हाऊसने करून दिली. भारत आणि अमेरिका देशांतील विविधता हीच आमची शक्ती आहे, असेही ओबामा म्हणाले होते.सर्व धर्मांना समान वागणूक देण्याच्या ओबामा यांच्या धोरणाची प्रशंसा करून एसएफजेचे कायदेशीर सल्लागार गुरपतवंतसिंग यांनी म्हटले आहे की, व्हाईट हाऊसने दिलेले उत्तर मोदी यांना पुन्हा धार्मिक सहिष्णुतेची आठवण करून देणारे आहे. (वृत्तसंस्था)
मोदींच्या वक्तव्याचे ओबामांकडून स्वागत
By admin | Published: February 22, 2015 12:06 AM