भारतातील नवीन वर्षाची प्रतीक्षा आता संपणार आहे. काही तासांत २०२३ वर्ष देशभरात साजरे केले जाईल आणि २०२२ भूतकाळातील गोष्ट असेल. २ वर्षांनंतर संपूर्ण जग कोरोनाच्या निर्बंधांशिवाय नवीन वर्ष साजरे करण्यास तयार आहे. सर्व प्रथम, न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू झाले असून ते मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहे.
न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम नवीन वर्षाची (२०२३) सुरुवात झाली. या दरम्यान, ऑकलंडमधील प्रसिद्ध स्काय टॉवर झगमगत्या दिव्यांनी सजवला जातो आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येथे फटाके उडवले जातात. या जल्लोषाचे व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाले आहेत. फटाके वाजवत तेथील नागरिकांनी जल्लोष केला आहे. न्यूझीलंडमधील प्रमाणवेळ भारतीय वेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे आहे.
दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा प्रथमच लोकांना नववर्षाचे स्वागत मोकळेपणाने करता यावे, यासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी आलिशान, तारांकित पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, डीजे आणि डान्स हे दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
सेलिब्रिटींचे आकर्षण
जुहू परिसरातील पंचतारांकित हॉटेलांत आयोजित पार्ट्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे बॉलीवूडमधील सेलिब्रिटीज. काही सेलिब्रिटी या ठिकाणी नृत्य करणार आहेत. अशा पार्ट्यांसाठी ५० हजार रुपये किमान आकारणी केली जात आहे.
पार्टीसाठी कॅम्प...
पार्टीसाठी केवळ हॉटेल्सच नव्हेत तर, काही खाजगी कंपन्यांनी मुंबईच्या नजीक कॅम्पदेखील आयोजित केले आहेत. पॅकेजनुसार, तीन हजार ते १० हजार रुपयांचे प्रति माणशी शुल्क आकारण्यात येत आहे. अलिबाग, किहीम, रेवस, नेरळ, कर्जत, पालघर आदी पट्ट्यांत कॅम्पसाईट आयोजित करण्यात आल्या आहेत.