ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 29 - अमेरिकेतील ट्रम्प सरकारने व्हिसावरुन पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. तर भारताला याबाबत सुट देण्यात आली आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार मार्च आणि एप्रिलमध्ये भारतीयांना अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या तात्पुरता व्हिसामध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या व्हिसामध्ये 40 टक्क्यांनी घट झाल्याचे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे भारतीयांना अमेरिकेची व्दारे बंद होतील की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ही आकडेवारी पाहून भारतीयांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिकांसाठी ही निराशेची बाब आहे.
वाचा - काय म्हणता पासपोर्ट आहे पण व्हिसाबद्दल ओ का ठो माहिती नाही! मग हे वाचायलाच हवं!
ट्रम्प प्रशासनाकडून एप्रिल 2017 मध्ये 3925 पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यात आला असून, मार्च महिन्यात 3917 जणांना व्हिसा देण्यात आला आहे. मागील वर्षी ओबामा प्रशासनाकडून एका महिन्यांमध्ये सरासरी 6553 पाकिस्तानी नागरीकांना व्हिसा देण्यात आला होता. त्यामुळे या संख्येत साधारणतः 40 टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2017मध्ये 87049 तर मार्चमध्ये 97925 भारतीय नागरिकांना अमेरिकी प्रशासनाने व्हिसा दिले होते. तर मागील वर्षी एका महिन्यात साधारण 72082 तात्पुरते व्हिसा देण्यात आले होते. वाचा - कसा मिळवायचा अमेरिकेचा व्हिसा?
अशाप्रकारे कमी नागरिकांना व्हिसा मिळणारा पाकिस्तान हा एकच मुस्लिमबहुल देश नाही तर अशा जवळपास 50 देशांतील नागरिकांना व्हिसा देण्याचे प्रमाण जवळपास 20 टक्क्यांनी कमी केल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले.