PM Modi meets Vladimir Putin on Russia Visit: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे दाखल होताच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे 'परम मित्र' असे वर्णन केले. पुतिन यांनी मोदींची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यांची गळाभेट घेतली. मॉस्को येथे पोहोचल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात सौहार्दाचे संबंध दिसून आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांनी जुन्या मित्रांप्रमाणे एकमेकांना मिठी मारत गळाभेट घेतली.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण पाठवले होते. त्यानुसार दोन्ही नेते मंगळवारी भारत आणि रशिया यांच्यातील २२व्या वार्षिक शिखर परिषदेत भेटतील. या द्विपक्षीय चर्चेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. याआधी आज जेव्हा दोन्ही नेते भेटले तेव्हा त्यांच्यातील घट्ट मैत्री स्पष्टपणे दिसून आली.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले, " परम मित्र नरेंद्र मोदी, तुमचे हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला. उद्या औपचारिक चर्चा (आमच्यात) होणार आहे. पण आज आपण त्याच विषयावर अनौपचारिकपणे, घरगुती गप्पांसारख्या वातावरणात चर्चा करू शकतो."
पंतप्रधान मोदींनीही पुतीन यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडिया साइट X वर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, "आज संध्याकाळी नोवो-ओगार्योवोमध्ये मला होस्ट केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मी आभारी आहे. तसेच उद्याच्या चर्चेची वाट पाहत आहे. भारत आणि रशियामधील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी ही चर्चा निश्चितच फायदेशीर ठरेल."