ऑनलाइन लोकमतस्योल, दि. 1 - अमेरिकेच्या दबावानंतरही उत्तर कोरिया अणुचाचणी घेण्याचा कार्यक्रम काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. आता उत्तर कोरियानं अमेरिकेला न जुमानता एक प्रकारे इशाराच दिला आहे. आम्ही कुठेही आणि कधीची न्यूक्लियर टेस्ट करू शकतो, अशी धमकीच उत्तर कोरियानं अमेरिकेला दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं स्वतःची यूएसएस कार्ल विल्सन ही युद्धनौका कोरियन द्विपकल्पात तैनात केली आहे. त्यामुळे कोरियन द्विपकल्पात तणाव वाढला आहे. तसेच कोणत्याही दबावाला न घाबरता उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनीही अमेरिकेला युद्धासाठी तयार असल्याची धमकी दिली आहे. आम्ही कोणत्याही हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णतः तयार आहोत. आम्ही कधीही आणि कुठेही अण्वस्त्र चाचणी करण्यासाठी सक्षम आहोत. मात्र याचा निर्णय देशाच्या सर्वोच्च नेत्याला घ्यावा लागणार आहे, असं वक्तव्य उत्तर कोरियाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. दरम्यान, अमेरिकेनं लष्करी कारवाई केल्यास त्यांना अण्वस्त्रांनी उत्तर देण्यात येईल, हेही उत्तर कोरियानं आधीच स्पष्ट केलं आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन हे सिव्हिल कायदा मानत नाहीत. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियानं अमेरिकेला 4 वेळा क्षेपणास्त्र हल्ला करण्याची धमकी दिली आहे. 2017मध्ये त्यांनी तीन क्षेपणास्त्रांची यशस्वीरीत्या चाचणी केली. 2006पासून आतापर्यंत उत्तर कोरियानं 5 अणुचाचण्या केल्या आहेत. गेल्या वर्षी त्यांनी हायड्रोजन बॉम्बसह 2 अणुचाचण्या केल्या होत्या. मार्च महिन्यात त्यांचं क्षेपणास्त्र जपानच्या समुद्री भागात पडलं होतं. त्यामुळे तणावात वाढ झाली आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये तणावाची परिस्थिती अत्यंत टोकाला गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनंही उत्तर कोरियाला चहूबाजूंनी घेरलं आहे. अमेरिकेनं अण्वस्त्रवाहू पाणबुडी, विमानवाहू जहाज कार्ल विन्सन आणि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली म्हणजेच थाडला कोरियन द्विपकल्पात तैनात केलं आहे. उत्तर कोरियाला अमेरिकेनं मोठ्या सैन्याच्या फौजफाट्यासह घेरलं आहे. तरीही उत्तर कोरियानं 25 एप्रिलला 85व्या लष्कर दिनानिमित्त सर्वात मोठा लष्कराचं संचलन करून स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच उत्तर कोरियाच्या सीमेवर दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान यांच्या लष्करानंही सर्वात मोठा संयुक्त सराव केला होता.
आम्ही कुठेही आणि कधीही न्यूक्लियर टेस्ट करू- उत्तर कोरिया
By admin | Published: May 01, 2017 5:34 PM