मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. रवांडा, युगांडा आणि द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर मोदी रवाना होत आहेत. 23 जुलै ते 27 जुलै असा पाच दिवसांचा मोदींचा हा दौरा आहे. रवांडा आणि युगांडा या देशाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. त्यामुळेच, जवळपास अवघे विश्वच मोदींच्या विदेश दौऱ्यांनी पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 4 वर्षात 54 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये आणखी दोन देशांचा समावेश होत आहे. रवांडा आणि युगांडा या दोन देशांच्या दौऱ्यांमुळे मोदी 56 देशांना भेट देणारे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. मोदींनी गेल्या 4 वर्षातील 171 दिवस विदेशात घावले आहेत. त्यामुळे पंतप्रधान कार्यकाळातील 12 टक्के वेळ त्यांचा परदेशात गेला आहे. गेल्या 4 वर्षांत मोदींच्या या दौऱ्यावर 1484 कोटी रुपयांचा खर्च झाला असून एप्रिल 2015 च्या दौऱ्यावेळी सर्वाधिक करण्यात आला आहे. त्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांना मोदींनी भेटी दिल्या होत्या. मोदींच्या 4 वर्षीय कार्यकाळात त्यांनी अमेरिकेला सर्वाधिकवेळा भेट दिली. दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या 9 वर्षातील कार्यकाळात विदेश दौऱ्यावर 642 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. मोदींच्या तुलनेत मनमोहनसिंग यांचा 9 वर्षातील विदेश दौऱ्यांचा खर्च निम्म्यापेक्षाही कमी आहे.