ढाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारपासूनच बांगलादेशच्या (Bangladesh) दोन दिवसीय दौऱ्यांवर आहेत. आज आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. यासंदर्भात स्वतः पंतप्रधान मोदींनीच ट्विट करून माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, आजच पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होत आहे. (West bengal assembly elections 2021 Narendra Modi Visit at jeshoreshwari kali temple in bangladesh)
पंतप्रधान मोदी मंदिर परिसरात येताच शंख वाजवून आणि गंध लावून त्यांचे स्वाग करण्यात आले. यावेळी त्यांनी देवीला एक मुकूट, साडी आणि इतर काही पूजेचे साहित्य अर्पण केले. 'जेशोरेश्वरी काली मंदिरात पूजा करून आपण धन्य झालो' असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबत मोदींनी आपला मंदिरातील पूजेचा एक व्हिडिओदेखील जोडला आहे. यावेळी मोदींनी मंदिर परिक्रमाही केली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी देवाला जो मुकूट अर्पण केला, त्या चांदीच्या मुकुटाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. हा मुकूट पारंपरिक कारागिरांनी तीन आठवड्यांत हातांने तयार केला आहे.
ओराकांडी मंदिराला भेट -यानंतर पंतप्रधान मोदींनी बांगलादेशातील मतुआ समाजाचे संस्थापक हरिचंद्र ठाकूर यांच्या ठाकूरबाडी म्हणजेच ओराकांडी मंदिरालाही भेट देऊन तेथे पूजा केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी मतुआ समाजालाही संबोधित केले.
आज माझी इच्छा पूर्ण झाली - मतुआ समाजाला संबोधित करताना मोदी म्हणाले, मी अनेक वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो. मी 2015 साली बांगलादेश दौऱ्यावर आलो होतो तेव्हा ओरकंडीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आज माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे, असे मोदी म्हणाले.
आपल्या दौऱ्यात मोदी सुगंधा शक्तीपीठालाही भेट देणार आहेत. हे हिंदूंच्या 51 शक्तीपीठांपैकी एक असल्याचे मानले जाते.
असा काढला जातोय राजकीय अर्थमोदींच्या बांगलादेशातील मंदिर भेटींकडे राजकीय दृष्टीनेही पाहिले जात आहे. मोदींच्या या मंदिर भेटीचा संबंध पश्चिम बंगालच्या निवडणुकांशीही जोडला जात आहे. एवढेच नाही, तर आज मोदींनी मतुआ समाजाचे संस्थापक हरिचंद्र ठाकूर यांच्या ठाकूरबाडी म्हणजेच ओराकांडी मंदिरालाही भेट देऊन तेथे पूजा केली. बंगालमध्ये मतुआ समुदायाची लोकसंख्या जवळपास दोन कोटी एवढी आहे.