प्रश्न: मला नुकत्याच मिळालेल्या माझ्या नव्या पासपोर्टवरील नाव, जुन्या पासपोर्टवरील नावापेक्षा वेगळं आहे. माझ्या जुन्या पासपोर्टवर मला अमेरिकेचा व्हिसा मिळालेला आहे. त्याची मुदत अद्याप संपलेली नाही. अशा परिस्थितीत रद्द झालेला पासपोर्ट मी अमेरिकेत प्रवास करण्यासाठी वापरू शकतो का?
उत्तर: विविध कारणांसाठी नावात बदल केला जातो आणि आम्ही हे समजू शकतो. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे नावात बदल होतो. तुम्ही रद्द झालेल्या पासपोर्टसोबतचा विसा नव्या पासपोर्टच्या मदतीनं वापरू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवास प्रत्येकवेळी अधिकचं ओळखपत्र सोबत ठेवावं लागेल. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना तुमच्या ओळखपत्राबद्दल किंवा हवाई प्रवास करण्याच्या तुमच्या पात्रतेविषयी काही शंका आल्यास त्यांच्याकडून विमानात प्रवेश करताना मज्जाव केला जाऊ शकतो. त्यामुळेच अमेरिकेत येताना आणि अमेरिकेतून बाहेर जाताना तुमच्या सध्याच्या नावावरील नवा पासपोर्ट सोबत ठेवण्याचा सल्ला अमेरिकेचं प्रशासन देतं.
उदाहरणार्थ, जर तुम्ही नव्या पासपोर्टमधील नावात लहानसा बदल केला असेल, (अनिलकुमारचं अनिल कुमार किंवा पुजाचं पूजा) तर तुम्ही दोन्ही पासपोर्टच्या मदतीनं प्रवास करू शकता. अशावेळी तुम्हाला नव्या विसासाठी अर्ज न करता नावात बदल केल्याचा पुरावा सोबत ठेवावा लागेल. याशिवाय कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी नाव बदलल्याच्या पुराव्याचं इंग्रजी भाषांतरदेखील सोबत ठेवावं लागेल.
व्हिसा देण्यात आलेली व्यक्ती तुम्हीच आहात हे पटवून देणारी कागदपत्रं तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. लग्न, घटस्फोट किंवा न्यायालयीन सूचनेमुळे तुमच्या नावात अधिकृतरित्या बदल झाला असेल, तर तुम्हाला नव्या पासपोर्टसाठी अर्ज करणं गरजेचं आहे. नवीन पासपोर्ट, जुन्या पासपोर्टवरील व्हिसा आणि लग्नाचा दाखला, घटस्फोटाची कायदेशीर प्रत किंवा इतर कागदपत्रांसोबत तुम्ही प्रवास करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही नव्या व्हिसासाठी अर्ज करू शकता. विसा आणि पासपोर्टवरील नाव सारखंच असल्यावर तुमचा प्रवास सुकर होतो.
एखाद्या व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय पूर्णपणे सीबीपीच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असतो. मात्र तुम्ही तुमच्या नावात झालेल्या बदलाविषयीची संपूर्ण कागदपत्रं बाळगल्यामुळे अधिकाऱ्यांना तुमची परिस्थिती समजून घेण्यास मदत होते.