प्रश्न- माझा पासपोर्ट चोरीला गेला असून त्यासोबतच अमेरिकेचा वैध व्हिसादेखील होता. मी आता काय करावं? मी गहाळ झालेल्या व्हिसाची तक्रार कशी नोंदवावी?उत्तर: तुम्ही गहाळ झालेल्या पासपोर्टची माहिती तातडीनं स्थानिक प्रशासनासह अमेरिकेच्या दूतावासाला द्यायला हवी. तुमची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अमेरिकेच्या नव्या व्हिसासाठी अर्ज करताना कागदपत्रं जमा करतेवेळी त्याची गरज भासते.व्हिसा हरवल्याची तक्रार सर्वप्रथम स्थानिक पोलिसांकडे करा. नेमकी काय घटना घडली, याची माहिती असणाऱ्या एफआयआरची प्रत पोलिसांकडून घ्या. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तुम्हाला जिथून व्हिसा जारी करण्यात आला, त्या अमेरिकेच्या दूतावासाला किंवा वकिलातीला याची माहिती द्या. यावेळी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीची प्रतदेखील जमा करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही india@ustraveldocs.com वर ई-मेल करू शकता. तुमचा पासपोर्ट, व्हिसा नेमका कसा हरवला, याची सविस्तर माहिती गहाळ झालेल्या पासपोर्टसह आणि व्हिसाच्या फोटोसह ई-मेलमध्ये द्या. याशिवाय एफआयआरची प्रतदेखील सोबत जोडा.तुम्ही अमेरिकेत असल्यास होमलँड सिक्युरिटी विभागाला व्हिसा हरवल्याची माहिती द्या. अरायव्हल/डिपार्चरची माहिती मिळवण्यासाठी https://www.uscis.gov/i-102 वर जाऊन आय-१०२ अर्ज भरा. गहाळ झालेला किंवा चोरीला गेलेला अमेरिकेचा व्हिसा पुन्हा जारी केला जात नाही. तुम्हाला नव्या नॉनइमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. अमेरिकेला प्रवास करायचा असल्यास तुम्हाला व्हिसा अर्ज शुल्क भरावं लागेल. नव्या व्हिसासाठी तुम्ही www.ustraveldocs.com/in संकेतस्थळावर अर्ज करू शकता. सध्या दूतावास व्हिसाच्या दैनंदिन कामांसाठी बंद आहे याची नोंद घ्या. तो कधी सुरू होणार याची माहिती आम्ही संकेतस्थळावर देऊ. तुम्हाला यासंदर्भात काही प्रश्न असल्यास कृपया india@ustraveldocs.com वर मेल करा. तुमच्या पुढील व्हिसा मुलाखतीला येताना जुन्या पासपोर्टची प्रत (उपलब्ध असल्यास) आणि पासपोर्ट गहाळ झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या अहवालाची मूळ प्रत घेऊन या. प्रवाशांनी अमेरिकेत दाखल होताच त्यांची बायोग्राफिक माहिती असलेल्या पासपोर्टमधील पानाची, अमेरिकन व्हिसाची आणि ऍडमिशन स्टॅम्पची एखादी प्रत काढून सुरक्षित ठेवावी, असं आवाहन आम्ही करतो.
पासपोर्ट, अमेरिकेचा वैध व्हिसा चोरीला गेल्यास काय करावं? कुठे तक्रार करावी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:23 PM