प्रश्न: स्टुडंट व्हिसासाठी पात्र ठरायचं असल्यास पुरेशी आर्थिक क्षमता असल्याचं दाखवून द्यायचं असतं असं मी ऐकलं आहे. त्यासाठी मी व्हिसा मुलाखतीला जाताना कोणती कागदपत्रं सोबत ठेवायला हवीत?
उत्तर: स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करताना दूतावासातील अधिकारी विविध मुद्दे विचारात घेतात. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती. शैक्षणिक संस्थेतील पहिल्या वर्षाचं शुल्क भरण्याची क्षमता असून इतर वर्षांचं शुल्क भरण्याची विश्वासार्ह योजना तयार असल्याचं स्टुडंट व्हिसा अर्जदारानं दूतावासातील अधिकाऱ्याला पटवून द्यावं लागतं. ही बाब अर्जदारानं कागदोपत्री नव्हे, तर तोंडी पटवून द्यायला हवी.
पहिल्या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कासाठी येणारा खर्च आय-२० अर्जावर (नॉनइमिग्रंट स्टुडंट व्हिसा स्टेटसच्या पात्रतेचं प्रमाणपत्र) नमूद केलेला असतो. हे प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थेकडून देण्यात येतं. एकूण शुल्कात शैक्षणिक शुल्कासोबत राहण्यासाठी येणारा खर्च, म्हणजेच वास्तव्यासाठी होणारा खर्च आणि जेवणाचा समावेश असतो.
अर्जदाराच्या आर्थिक योजनेत विविध उत्पन्नाच्या स्रोतांचा समावेश असतो. यात वैयक्तिक बचत, शिष्यवृत्ती, सरकारी किंवा खासगी बँकेकडून मिळालेलं कर्ज किंवा भारतात, अमेरिकेत किंवा इतरत्र वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा समावेश असतो. प्रत्येक अर्जदाराची आर्थिक योजना वेगळी असते आणि याबद्दल दूतावासातील अधिकाऱ्याला याची कल्पना असते. तुमच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण माहिती, तुमची आर्थिक योजना दूतावासातील अधिकाऱ्यांना सांगणं अतिशय गरजेचं आहे. परवानगी नसलेल्या रोजगारातून मिळणाऱ्या पैशाचा वापर करून तुम्ही शैक्षणिक शुल्क भरू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. अभ्यासक्रम व्यावहारिक प्रशिक्षण (सीपीटी) आणि पर्यायी व्यावहारिक प्रशिक्षण (ओपीटी) विद्यार्थ्यांच्या आर्थिक योजनेचा भाग असू शकतात. पण विद्यार्थ्यांचं पहिलं शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांना सीपीटीची सुरुवात करता येत नाही. त्यामुळेच तुमच्या पहिल्या वर्षाचं शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सीपीटी आणि ओपीटीचा आधार घेतला जाऊ शकत नाही.
अमेरिकन व्हिसाच्या अर्जाची प्रक्रिया कागदपत्र आधारित नाही, तर ती मुलाखतीवर आधारित आहे, ही बाब लक्षात ठेवा. अर्जदारांना त्यांची आर्थिक योजना तोंडी आणि संक्षिप्तपणे सांगता यायला हवी. त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची गरज नाही. स्टुडंट व्हिसा मुलाखतीसाठी केवळ वैध पासपोर्ट, डीएस-६० (व्हिसा अर्ज) कन्फर्मेशन पेज, वैध आय-२० अर्ज आणि सेविस शुल्क भरल्याचा पुरावा लागतो. अधिकाऱ्याला अतिरिक्त कागदपत्रं हवी असल्यास अधिकारी मुलाखतीनंतर अर्जदाराला ती सादर करण्याची संधी देतो.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.