- रविंद्र देशमुख
ब्रिटनमध्ये मागील आठवड्याच्या अखेरीस ऐतिहासिक सार्वमत झाले अन् हा देश युरोपियन युनियनमधून बाहेर पडला. तेव्हापासून युरोपियन युनियन चर्चेत आले आणि या युनियनबद्दलची उत्सुकताही वाढली. सन २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीमुळे जग जितके हादरले होते. तितकेच ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याने हादरले. युरोपियन युनियनमधील देशातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीही धाडधाड कोसळल्या. संपूर्ण विश्वाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकणारे युरोपियन युनियन नेमके आहेत तरी काय?...पाहुयात.युरोपियन युनियन हा युरोपमधील देशांचा राजकीय - आर्थिक संघ आहे. १ नोव्हेंबर १९९३ रोजी हा संघ स्थापन झाला. ब्रिटनने या युनियनशी काडीमोड केल्यामुळे आता संघाची सदस्य संख्या २७ झाली आहे. बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्स शहरात युरोपियन युनियनची राजधानी आहे. गत वर्षापर्यंत युरोपियन युनियनमधील सदस्य देशातील बेरोजगारीचा दर ९.६ टक्के होता. ब्रिटनने घटस्फोट घेतल्यापासून तो आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.युरोपियन युनियन स्थापन करण्याचा मागचा मुख्य उद्देश म्हणजे सदस्य देशातील नागरिकांचे परस्परांमध्ये मुक्त दळणवळण व्हावे. वस्तू, सेवा आणि भांडवलाची सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये देवाण - घेवाण व्हावी. व्यापार, कृषी आणि विभागीय विकास आदीसंदर्भात समान धोरण आखले जावे. युरोपियन युनियनच्या अर्थविषयक संघाची संघाची स्थापना १९९९ मध्ये झाली. यामध्ये १९ सदस्य देशांचा समावेश होता. सन २००२ मध्ये या संघाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले अन् ह्ययुरोह्ण चलनात आले.युरोपियन युनियनमधील निर्णय प्रक्रिया त्यातील प्रमुख सदस्य देशांच्या हातात आहे. निर्णय प्रक्रियेसाठी युरोपियन कौन्सिल तयार करण्यात आले आहे. शिवाय यासाठी सात प्रमुख परिषदा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्या अशा-कौन्सिल आॅफ युरोपियन युनियन, युरोपियन पार्लमेंट, युरोपियन कमिशन, कोर्ट आॅफ जस्टीस आॅफ युनियन, युरोपियन सेंट्रल बँक, युरोपियन कोर्ट आॅफ आॅडीटर्स.ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर आता युनियनचे सदस्य देश असे - बेल्जियन, फ्रान्स, इटली, लक्झमबर्ग, नेदरलँडस्, जर्मनी, डेन्मार्क, आयर्लंड, ग्रीस, पोर्तुगाल, स्पेन, आॅस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, इस्टोनिया, लॅटव्हिया,लिथुनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हकिया, स्लोव्हकिया, बल्जेरिया, रूमानिया, क्रोएशिया.