मुंबई- बहुतांशवेळा आपण देश व राष्ट्र या संकल्पना समानार्थी आहेत असे समजून वापरत असतो. इंग्लिश भाषेत कंट्री, नेशन, स्टेट, नेशनस्टेट अशा संकल्पना आहेत. त्यांचा वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख होत असतो, मात्र आपण त्याचा अर्थ देश असा घेतो. मात्र या सर्व संकल्पना वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या लोकसमुहास एक सरकार नियंत्रित करत असेल तर त्यास देश असे म्हणतात, त्या लोकसमुहावर संबंधित सरकारचा अंमल चालतो. अशाप्रकारे देशाची व्याख्या करता येईल. देशामध्ये सर्व नियंत्रण करण्यासाठी एक राजकीय व्यवस्था असते.मात्र राष्ट्र ही संकल्पना पूर्णतः वेगळी आहे. एखादा व्यक्तीसमूह समान भाषा, ओळख, वंश, इतिहासाने एकमेकांशी बांधला गेला असेल तर त्यास राष्ट्र असे म्हणतात. साधारणतः समान संस्कृती हे राष्ट्र तयार होण्यासाठी पोषक असते. जर एखादे राष्ट्र एखाद्या सरकारच्या नियंत्रणाखाली आले असल्यास त्यालाही देश असे म्हटले जाते.याचाच अर्थ एका देशामध्ये अनेक राष्ट्रे असू शकतात. उदाहरण द्यायचे झाल्यास अमेरिकेतील अनेक मूळचे लोक स्वतःच्या गटांना राष्ट्र म्हणवतात. चेरोकी नेशन हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल. असे असले तरी शेवटी ते अमेरिकेच्या संयुक्त राज्यसमुहांपैकी एक आहेत. त्यांच्यावर नियंत्रण अमेरिकन सरकारचेच आहे.युनायटेड किंग्डमचे उदाहरण द्यायचे झाल्यास त्यामध्ये स्कॉटलंड, वेल्स, नॉर्दर्न आयर्लंड अशी राष्ट्रे म्हणजे नेशन्स सामावलेली आहेत. ही वेगवेगळी ओळख असणारी राष्ट्रे असली तरी युनायटेड किंग्डम या एका नावाखाली त्यांचे नियंत्रण केले जाते.मात्र काही देशांना आपल्या राजकीय हद्दीमध्ये अनेक नेशन्स म्हणजे राष्ट्रे असणे पसंत नाही. त्यामुळेच इराकमध्ये कुर्दांना मान्यता दिली जात नाही. त्यामुळेच कुर्दांना स्वतःचा वेगळा देश आहे. कुर्द हे मध्यपूर्वेत इराक, सीरिया अशा अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. त्यामुळे त्यांना स्टेटलेस नेशन म्हणजे देश नसणारे राष्ट्र असे म्हटले जाते.
राष्ट्र आणि देश यामध्ये नक्की फरक तरी काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:03 AM