मक्का हे मुस्लिमांचं पवित्र स्थान मानलं जाते. याठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुस्लीम समाज हज यात्रेसाठी येतो परंतु एखादा मुस्लीम नसलेला व्यक्ती हज यात्रा करू शकतो का, किंवा केला तर त्याच्यासोबत काय होते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ते जाणून घेऊया.
हज यात्रा २०२५ साठी रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. अलीकडेच सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयाकडून हज यात्रेबाबत नियमांमध्ये काही बदल केलेत. यापुढे लहान मुले हज यात्रेत जाऊ शकत नाहीत. वाढत्या संख्येमुळे गर्दीचा धोका पाहता लहान मुलांच्या हज यात्रेवर बंदी आणण्यात आली आहे. त्याशिवाय आता अशा लोकांना अधिक प्राधान्य दिले जाईल जे पहिल्यांदाच हज यात्रा करण्यासाठी अर्ज करत आहेत.
मुस्लिमांशिवाय कुणी हज यात्रा करू शकतं?
हज यात्रा सुरू झाल्यानंतर अनेक सर्वसामान्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात. त्यातील एक प्रश्न म्हणजे एखादा मुस्लीम नसलेला व्यक्ती हज यात्रेला जाऊ शकतो का? यावर इस्लाम अभ्यास सांगतात की, नियमांनुसार हज यात्रेत जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट अशी आहे की तो व्यक्ती मुस्लीम असला पाहिजे. म्हणजेच मुस्लीम व्यक्तीशिवाय कुणीही हज यात्रा करू शकत नाही. मग जर कुणी परवानगी नसतानाही हज यात्रेसाठी जातो तर त्याच्यावर काय कारवाई होते? अशा परिस्थितीत सौदी अरब सरकार संबंधित व्यक्तीला अटक करून त्यांच्या देशात डिपोर्ट करू शकते अथवा त्या व्यक्तीविरोधात कायद्यानुसार कारवाई होऊन त्याला दंड आणि जेलची शिक्षाही होऊ शकते.
सर्व मुस्लीम 'हज' यात्रेला जातात?
जगातील सर्वच मुस्लीम हज यात्रेला जातात का हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हजला जाण्यासाठी मुस्लीम असणं ही पहिली अट आहे. परंतु जगातील एक असाही मुस्लीम समाज आहे ज्यांना हज यात्रा करण्यावर बंदी आहे. ते आहेत अहमदिया मुसलमान, अहमदिया मुस्लिमांना इतर मुस्लीम समाज मुसलमान मानत नाही. सौदी अरबने त्यांच्या हज यात्रेवर बंदी आणली आहे. जर त्यातील कुणी हज करण्यासाठी मक्का इथं पोहचतात तर त्यांच्या अटकेचा आणि डिपोर्ट होण्याचा धोका असतो. अहमदिया मुसलमानही हज यात्रेला जाऊ शकत नाहीत.