नवी दिल्ली-
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अशा टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे की जिथं अणुहल्ल्याची चर्चा होऊ लागली आहे. क्रिमिया ब्रिजवरील हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चांगलेच संतापले आहेत. रशियाकडून युक्रेनवर मिसाइलचा नुसता पाऊस सुरू आहे. युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी रशियाकडून जोरदार हल्ले चढवले जात आहेत. यात युक्रेनच्या कीव्ह आणि खारकिव्हमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ला केला जात आहे. त्यात आता संतापलेले पुतीन लवकरच युक्रेनवर अणुहल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
पुतीन यांनी युक्रेनवर अणुहल्ला केला तर अमेरिकेची प्रतिक्रिया काय असेल? असं अमेरिकन न्यूज चॅनल सीएनएनच्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती ज्यो बायडन यांना विचारण्यात आलं. त्यावर बायडन यांनी दिलेल्या रोखठोक प्रतिक्रियेनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आम्हाला कुणाला विचारण्याचीही गरज भासणार नाही, असं एका वाक्यात बायडन यांनी उत्तर दिलं आणि आपला इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे अणुहल्ल्याच्या परिस्थितीत अमेरिका उत्तर देण्यासाठी सज्ज आहे असं बायडन यांनी सूचित केलं आहे.
"आम्ही काय करू आणि काय नाही? हे आताच सांगण बेजबाबदारपणाचं लक्षण ठरेल", असं सूचक विधान बायडन यांनी केलं. तसंच जी-२० परिषदेत पुतीन यांची भेट घेणार का? असंही बायडन यांना विचारण्यात आलं. त्यावर बायडन यांनी स्पष्टपणे नकार दिला नाही. पण पुतीन यांच्या भेटीसाठी काही अटी त्यांनी व्यक्त केल्या. "पुतीन यांची भेट घेण्याचा माझा कोणताही इरादा सध्या नाही. पण जी-२० परिषदेत ते माझ्यासमोर आले आणि ग्रिनरच्या सुटकेबाबत त्यांनी माझ्याशी बोलण्याची तयारी दाखवली तर मी त्यांना भेटेन. पण तेही परिस्थितीवर अवलंबून आहे", असं ज्यो बायडन म्हणाले. ग्रिनर हा अमेरिकेचा बास्केट बॉल खेळाडू आहे. त्याला रशियानं अटक केली असून ९ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. "रशियानं माणुसकीला काळीमा फासणारं काम केलं आहे. त्यांनी युद्धाचा गुन्हा केला आहे. त्यामुळे पुतीन यांची भेट घेण्याचा माझा कोणताही इरादा नाही", असंही बायडन म्हणाले.