चीनने नेहमी विविध प्रकारचे प्रयोग करुन जगाला चकित करतो. काही काळापूर्वी त्यांनी प्रयोगशाळेत चक्क कृत्रिम सूर्य तयार करुन सर्वांना चकीत केले होते. आता यावेळी ड्रॅगन पृथ्वीच्या पोटात जाऊन विज्ञानाच्या सर्वात मोठ्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ते जमिनीच्या 700 मीटर खाली, 35 मीटर व्यासाची गोल प्रयोगशाळाही बांधत आहेत. या अनोख्या प्रयोगशाळेत चीन काय करणार आणि त्याचा जगावर काय परिणाम होणार, जाणून घेऊ...
चीन ग्वांगडोंग राज्यातील कॅपिंग शहरात जियांगमन अंडरग्राउंड न्यूट्रिनो लॅब (जुनो) नावाची प्रयोगशाळा बनवत आहे. यामध्ये शास्त्रज्ञ न्यूट्रिनो म्हणजेच अणूच्या आकारापेक्षा लहान कणांचे निरीक्षण करतील. लॅबच्या उभारणीसाठी तीन हजार कोटी रुपये खर्च येणार असून वर्षअखेरीस ती तयार होईल, असा अंदाज आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, न्यूट्रिनो काय आहे आणि त्याचे काय काम असते?
न्यूट्रिनो म्हणजे काय?तुम्ही शाळेत वाचलेच असेल की, जगातील प्रत्येक गोष्ट अणूपासून बनलेली आहे. अणूच्या मध्यभागी एक केंद्रक आहे, ज्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसच्या आत राहतात. न्यूट्रिनो आणि न्यूट्रॉन सारखे वाटू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. न्यूट्रिनो या सर्वांपेक्षा खूपच लहान कण आहे. हा इतका हलका आहे की, बऱ्याच काळापासून शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, त्याचे वस्तुमान शून्य आहे. न्यूट्रिनो हे इलेक्ट्रॉनसारखे मूलभूत कण आहेत, परंतु ते अणूचा भाग नाहीत. मूलभूत कण म्हणजे, ते खंडित होऊ शकत नाहीत. या जगात न्यूट्रिनो मोठ्या प्रमाणावर आहेत. तुम्हाला माहितीही नसेल, पण प्रत्येक सेकंदाला सूर्याद्वारे तयार होणारे लाखो न्यूट्रिनो आपल्या शरीरातून जातात.
चीन जमिनीखाली काय शोधत आहे?पूर्वीच्या वैज्ञानिक संशोधनात आतापर्यंत तीन प्रकारचे न्यूट्रिनो सापडले आहेत - इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो, म्युऑन न्यूट्रिनो आणि टाऊ न्यूट्रिनो. चीनच्या भूमिगत प्रयोगशाळेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की, यापैकी कोणत्या प्रकारच्या न्यूट्रिनोचे वस्तुमान जास्त आहे आणि कोणते कमी आहे, हे जाणून घेतले जाणार आहे. जमिनीखाली बांधलेल्या प्रयोगशाळेत त्यांचा चांगला अभ्यास करता येतो. न्यूट्रिनो अणुभट्ट्यांद्वारे कृत्रिमरित्या तयार करता येतात. पण, त्यांचा अभ्यास करणे खूप कठीण आहे.
विज्ञानातील सर्वात मोठे न उलगडलेले रहस्यन्यूट्रिनोने जगभरातील देशांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे विज्ञानातील सर्वात मोठे न सुटलेले रहस्य आहे. शास्त्रज्ञ हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, न्यूट्रिनो उर्वरित गोष्टींशी कसा संवाद साधतात. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, बिग बँग नंतर सर्व प्रतिपदार्थ नाहीसे होण्याचे कारण न्यूट्रिनो होते, ज्यामुळे विश्वात फक्त पदार्थ शिल्लक राहिले. मासातोशी कोशिबा यांना 2002 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे न्यूट्रिनो शोधण्यासाठी आणि मोजण्यासाठी देण्यात आले होते.