प्रश्न- मी माझ्या मित्राकडून के व्हिसाबद्दल ऐकलं. तो नेमका कोणता व्हिसा असतो आणि मी त्याच्यासाठी अर्ज करू शकतो का?उत्तर- के व्हिसामुळे अमेरिकेच्या नागरिकाशी साखरपुडा झालेल्या व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश मिळतो. मात्र अशी व्यक्ती अमेरिकेत आल्यावर 90 दिवसांमध्ये तिला लग्न करावं लागतं. अमेरिकन नागरिकाशी लग्न केल्यानंतर परदेशी व्यक्ती अमेरिकेच्या कायदेशीर कायमस्वरुपी नागरिकत्वासाठी (एलपीआर) सिटिझन अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडे (यूएससीआयएस) अर्ज करू शकते. के-1 व्हिसा तांत्रिकदृष्ट्या नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. के व्हिसा धारकानं 90 दिवसांत अमेरिकन नागरिकाशी विवाह न केल्यास त्या व्यक्तीला देश सोडावा लागतो. या व्हिसामुळे संबंधित व्यक्तीला अमेरिकेत वास्तव्य करण्याची परवानगी मिळते. मात्र त्यासाठी तिनं इमिग्रंट व्हिसासाठी आवश्यक निकष पूर्ण केलेले हवेत. के-1 व्हिसा धारक व्यक्ती आपल्या अल्पवयीन अपत्यासाठी के-2 व्हिसासाठी अर्ज करू शकते. के-1 व्हिसासाठी किमान आवश्यक बाबी- जी व्यक्ती अमेरिकेत येत आहे, तिच्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती अमेरिकन असावी. या दोन्ही व्यक्तींच्या अमेरिकेत होणाऱ्या लग्नात कोणतीही कायदेशीर अडचण नसावी. या दोन्ही व्यक्ती गेल्या दोन वर्षात एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेल्या असाव्यात. याशिवाय साखरपुडा झालेल्या व्यक्तीनं पोलीस रेकॉर्ड आणि वैद्यकीय चाचण्या याबद्दलची कागदपत्रं देणं गरजेचं आहे. अर्जदार आणि साखरपुडा झालेल्या व्यक्तीनं काऊन्सिलर ऑफिसरसमोर मुलाखतीसाठी येऊन त्या दोघांना अमेरिकेत राहण्याची इच्छा आहे हे सांगणं अतिशय आवश्यक आहे. साखरपुडा झालेल्या व्यक्तीनं अर्ज करण्याआधी अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीनं यूएससीआयएसकडे I-129F याचिका आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. याबद्दलचा अर्ज आणि सूचना यूएससीआयएसच्या संकेतस्थळावर https://www.uscis.gov/i-129f उपलब्ध आहे. यूएससीआयएसनं याचिका मंजूर केल्यावर अमेरिकन नागरिकाला याची माहिती आणि केस नंबर देण्यात येतो. यानंतर यूएससीआयएसकडून याचिका नॅशनल व्हिसा सेंटरकडे (एनव्हीसी) पाठवली जाते. यानंतर एनव्हीसीकडून साखरपुडा झालेल्या व्यक्तीला मुलाखतीचा तारीख दिली जाते. अमेरिकेच्या मुंबईतील दुतावासात ही मुलाखत होते. के व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतातील सर्व व्यक्तींच्या मुलाखती याच ठिकाणी होतात. एनव्हीसीकडून मुलाखतीची तारीख मिळाल्यावर संबंधित व्यक्तीनं दुतावासात येऊन काऊन्सिलर ऑफिसरची भेट घेणं गरजेचं आहे. मुलाखतीला येताना व्हिसासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं घेऊन या. ही कागदपत्रांची संपूर्ण यादी यूएससीआयएसच्या संकेतस्थळावर http://www.travel.state.gov उपलब्ध आहे. व्हिसाच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ केसवर अवलंबून असतो. प्रक्रिया पूर्ण करताना प्रामाणिक राहा आणि सर्व सूचनांचं पालन करा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.
के व्हिसा म्हणजे नक्की काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 3:43 PM