अवकाशातील नवनव्या आश्चर्यांची गुपिते शोधण्यासाठी मानव जसा धडपडत असतो तसाच सागराचा तळ ढवळून काढत त्यातील गुपिते उकलण्यातही मानवप्राण्याला रस असतो. समुद्राच्या तळाशी या गुपितांबरोबरच वैविध्यपूर्ण जीवसृष्टीही सुखेनैव नांदत असते. मासा हा या जीवसृष्टीचा आद्यप्राणी. माशांमध्येही अनेक प्रकार असतात. त्यात व्हेल मासा जास्त भाव खातो. या व्हेल माशाच्या मळाला बाजारात प्रचंड मागणी असते.अंबरग्रीस हा काय प्रकार आहे?सागरात विहार करताना स्पर्म व्हेलच्या पोटात अनेक प्रकारचे मासे त्याचे भक्ष्य म्हणून विसावतात. त्यात कठीण कवच असलेल्या स्क्वीड्सचाही समावेश असतो. हे स्क्वीड्स स्पर्म व्हेलच्या पोटात गेल्यानंतर त्यांचे पचन होऊन कठीण कवचाचे तुकडे तसेच राहतात. या कवचाभोवती व्हेल माशाची पचनसंस्था एक विशिष्ट आवरण तयार करून त्यास व्हेल माशाच्या पार्श्वभागाकडे ढकलते.व्हेल माशाच्या मलविसर्जन प्रक्रियेदरम्यान हा भाग त्याच्या शरीराबाहेर पडतो. समुद्रावर तो तरंगत राहतो. सुरुवातीला या मळाला प्रचंड दुर्गंधी असते. मात्र, समुद्राच्या लाटांनी प्रक्रिया होऊन ही दुर्गंधी कमी होते. स्पर्म व्हेल नावाच्या माशाच्या पोटातून जो मळ सागरात विसर्जित होतो त्याला अंबरग्रीस असे नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मूल्यवानव्हेल माशाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या या अंबरग्रीसला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. अंबरग्रीसची दुर्गंधी कमी झाल्यावर त्यातील घटक पदार्थांतून बेचव मद्यार्क निघतात.या मद्यार्कांचा वापर स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीत केला जातो. अत्तराची निर्मितीही अंबरग्रीसपासून केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो अंबरग्रीसची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जाते. अंबरग्रीसच्या मूल्यामुळे त्याची तस्करी केली जाण्याचा धोका असतो. त्यामुळे अंबरग्रीस बेकायदेशीरपणे जवळ बाळगणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी अंबरग्रीसची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली होती.
समुद्रातलं तरंगतं सोनं! व्हेल माशाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या अंबरग्रीसची किंमत पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 6:02 AM