प्रश्न: मी अमेरिकेचा कायदेशीर कायमस्वरुपी रहिवासी (एलपीआर) रहिवासी असून भारत भेटीवर आलो आहे. कोरोना महामारीमुळे मला १५ महिने अमेरिकेला जाता आलं नाही. मी अमेरिकेला कसा परतू शकतो?
उत्तर: कायदेशीर कायमस्वरुपी रहिवाशांना (एलपीआर) ग्रीन कार्डधारकदेखील म्हटलं जातं. ग्रीन कार्डधारकांना अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्याची परवानगी असते. एका वर्षाहून अधिक काळ अमेरिकेबाहेर राहणाऱ्या किंवा वैध कालावधीपेक्षा अधिक काळ अमेरिकेबाहेर वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीनं त्याचं नागरिकत्व सोडलं असल्याचं समजलं जातं. अमेरिकेत परतण्यासाठी तुम्हाला रिटर्निंग रेसिडंट (SB-1) इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करावा लागतो.
रिटर्निंग रेसिडंट अर्जासाठीचं शुल्क पुन्हा मिळत नाही. हा अर्ज केल्यावर व्हिसा मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे तुम्ही अर्जासाठीचे निकष काळजीपूर्वक पाहून आणि तुमची वैयक्तिक स्थिती विचारात घेऊन मगच अर्ज करायला हवा.
मुंबईतल्या अमेरिकेच्या दूतावासात तुम्ही रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी अर्ज करू शकता. सर्वात आधी http://www.ustraveldocs.com/in वर जाऊन रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी अपॉईंटमेंट निश्चित करा. त्यानंतर अर्जासाठीचं शुल्क भरा आणि डीएस-११७ अर्ज भरा. दूतावासातील अधिकाऱ्यांनी तुम्हाला रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी पात्र ठरवल्यास तुम्ही रिटर्निंग रेसिडंट एसबी-१ व्हिसा प्रक्रिया पूर्ण करायला हवी. ही प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला व्हिसा प्रकियेसाठी आवश्यक शुल्क, वैद्यकीय चाचणी पूर्ण करावी लागते. याशिवाय पोलिसांकडून ना हरकत अहवाल आणि इतर नागरी कागदपत्रं मिळवणंदेखील गरजेचं असतं. यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी अपॉईंटमेंटसाठी वेळ घ्यावी लागते. तुम्ही http://www.ustraveldocs.com ला भेट जाऊन एसबी-१ इमिग्रंट व्हिसा कॅटेगरीमध्ये जाऊन तुमची मुलाखत निश्चित करू शकतो.
तुमच्या मुलाखतीच्या दिवशी खालील कागदपत्रं आवश्यक असतात:१. वैध पासपोर्ट२. दोन २x२ इंच फोटो३. https://ceac.state.gov/ceac वर जाऊन भरलेला डीएस-२६० फॉर्म आणि प्रिंट केलेलं कन्फर्मेशन पान४. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून मिळालेल पोलीस ना हरकत प्रमाणपत्र५. अधिकृत डॉक्टरांच्या पॅनलकडून वैद्यकीय चाचणी पूर्ण करा. या डॉक्टरांची यादी https://in.usembassy.gov/visas/immigrant-visas/ वर उलपब्ध आहे.६. एसबी-१ अर्ज शुल्क भरा.७. मूळ एलपीआर कार्ड आणि रि-एंट्री परवाना (असल्यास)८. इतर आवश्यक कागदपत्रं, अर्जदार त्याच्या अमेरिकेतील निवासस्थानी परतत असल्याचे पुरावे
मुलाखतीदरम्यान तुम्हाला मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला तुमचे अमेरिकेशी सातत्यानं असलेले संबंध समजावून सांगता यायला हवेत. तुम्हाला परदेशातून राहाव लागलं, तिथला मुक्काम वाढणार यामागची कारणं/परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर होती, परदेशातून काही काळ वास्तव्य करून अमेरिकेत परतण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतात, हे तुम्हाला मुलाखतीवेळी पटवून देता यायला हवं.
अर्ज प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही रिटर्निंग रेसिडंट स्टेटसाठी अपात्र ठरलात, तुमचा अमेरिकेतील नातेवाईक तुमच्या वतीनं नव्या इमिग्रंट व्हिसासाठी तुम्ही ज्या श्रेणीतून अर्ज केला आहे, त्याच श्रेणीतून अर्ज करू शकतो.