ऑक्सफर्ड डिक्शनरीतर्फे दरवर्षी ‘वर्ड ऑफ द इयर’ घोषित केला जातो; म्हणजे असा शब्द, जो त्या वर्षभरात लोकांच्या तोंडी राहिला, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला! या वर्षी कोणत्या शब्दाला हा मान मिळाला माहीत आहे? हा मान मिळालाय Vax या शब्दाला. ‘व्हॅक्सिन’ या शब्दाची दादागिरी त्यानं मोडून काढली.
व्हॅक्सिन हा शब्द मार्च २०२० पासून जगात सगळ्यांनी जितक्या वेळा वापरलाय तेवढा कदाचित त्याआधीच्या अनेक वर्षांत वापरला गेला नसेल. व्हॅक्सिन हा शब्द देवी या रोगावरचं पहिलं व्हॅक्सिन शोधलं तेव्हापासून म्हणजे १७९६ सालापासून वापरात आला. स्मॉल पॉक्स ऊर्फ देवी या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी काऊ पॉक्स या रोगाचे जंतू वापरून लस तयार करायची. हे काम एडवर्ड जेनर याने १७९६ साली पहिल्यांदा केलं. त्यानेच त्या वेळी त्या औषधीसाठी व्हॅक्सिन हा शब्द पहिल्यांदा वापरला. आज आपण व्हॅक्सिन हा शब्द सरसकट लस अशा अर्थी वापरत असलो तरी त्याचा मूळ अर्थ मात्र तो नव्हे. व्हॅक्सिन हे नाव त्याने दिलं, कारण तो जी लस बनवायचा ती गायींना होणाऱ्या काऊ पॉक्स या रोगाचे जंतू वापरून बनवायचा.
पुढे मग ‘प्रतिबंधक लस’ अशा अर्थी व्हॅक्सिन हाच शब्द इंग्रजीमध्ये रूढ झाला. अर्थातच इंग्लंड सोडून इंग्लिश बोलणाऱ्या इतर देशांमध्ये त्यासाठी इतर समानार्थी शब्दही आले. व्हॅक्सिनला shot किंवा jab असंही नाव वापरलं जावू लागलं, पण ते बोलीभाषेतील नाव म्हणून तसं दुय्यमच राहिलं. यावर्षी मात्र ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर असलेल्या शब्दाने व्हॅक्सिन या शब्दाच्या अनभिषिक्त स्थानालाच धक्का दिला आहे.
प्रत्येक शब्द, संकल्पना, विषय सोपा आणि सुटसुटीत करण्याच्या काळात व्हॅक्सिन हा अवघड शब्द इतका काळ टिकला हेच खूप म्हणायचं. कदाचित तो शब्द फार वापरला जात नव्हता म्हणून तो आहे तसा चालवून घेतला गेला. पण १९८० पासून वापरात असलेल्या vax या शब्दाने २०२१ सालात व्हॅक्सिन या शब्दाची जागा घेऊन टाकली.
हा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर ठरवतात कसा हे बघणंही गंमतीचं आहे. ऑक्सफर्डच्या १४.५ बिलियन शब्दांच्या भांडारातून जगभरातल्या बातम्यांमधून तो शब्द किती आणि कसा वापरला गेला हे बघून तो त्या वर्षीचा वर्ड ऑफ द इयर आहे की नाही ते ठरवलं जातं. शिवाय पुढे जावून बदलणाऱ्या परिस्थितीत तो शब्द टिकून राहील का, याचाही विचार ते ठरवतांना केला जातो. अर्थात असं शब्दांच्या बदलत्या वापराकडे लक्ष ठेवणं, त्यातला असा एक शब्द निवडणं हे अगदी हलक्याफुलक्या मूडमध्ये गमतीने केलं जातं. मात्र, तरीही त्यातून भाषा आणि शब्द कसे बदलत जातात याचं एक चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतंच. आपल्याकडे हिंदीत व्हॅक्सिनसाठी टीका आणि मराठीत लस असे अगदी नेहेमी वापरात असणारे शब्द खरं म्हणजे आहेत. पण करोनाच्या काळात आपल्याकडेही “लस घेतली का?” इतकाच “व्हॅक्सिन घेतलं का?” हा प्रश्नही ऐकू येतो आहे. त्यात आपल्याकडचे सोपे मराठी शब्द सोडून देवून उगाच इंग्लिश शब्द वापरण्याची हौस, इंग्लिश शब्द वापरणं म्हणजे काहीतरी जास्त भारी, ही धारणा अशी सगळी कारणं आहेतच. त्याला विरोध करणारी मंडळी हट्टाने त्याला पर्यायी मराठी शब्द वापरत राहतात हेही आहेच. यात काही वेळा मराठी शब्द टिकतो, तर काही वेळा तो इंग्लिश शब्दाने पुसून टाकला जातो. भाषा ही मुळात प्रवाही असल्यामुळे हे कायमच चालू असतं. पण हा फक्त आपली भाषा का परकीय भाषा असा विषय नाहीये.कारण इंग्लिश भाषेत इंग्लिश भाषेतलाच जुना शब्द बाजूला टाकून देवून नवीन शब्द वापरात आणण्याची प्रक्रिया सहजतेने होतांना दिसते आहे. आपल्याहीकडे लस घेऊन आलेल्यांना लसवंत होणे वगैरे शब्द वापरले गेले. पण ते टिकलेले दिसले नाहीत. तसे काही शब्द इंग्लिशमध्येही येऊन गेले, पण टिकले नाहीत.
अर्थात आता सगळ्या जगाची मनःस्थिती अशीच आहे की, व्हॅक्सिन म्हणा, jab म्हणा, shot म्हणा नाही तर vax म्हणा… पण ते द्या आणि हा करोना एकदाचा घालवा. अर्थात करोना कधी ना कधी आपली पाठ सोडेलच, पण त्याची आठवण म्हणून अनेक शब्द मागे सोडून जाईल. लॉकडाऊन… मास्क… सॅनिटायझर त्यातलाच एक शब्द असेल vax!
छोटा आणि लक्ष वेधून घेणारा शब्दऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रकाशित करणाऱ्या टीममधल्या एक सिनियर एडिटर फिओना मॅकफर्सन म्हणतात की, व्हॅक्सिनसाठी इतरही अनेक शब्द या काळात वापरले गेले, त्यांचा वापर वाढला. पण vax या शब्दाइतका सातत्याने आणि वेगाने कुठल्याच शब्दाचा वापर वाढला नाही. Vax हा सहज वापरण्याजोगा, छोटा आणि लक्ष वेधून घेणारा शब्द आहे. एक लेक्सिकोग्राफर म्हणून मला असंही वाटतं की हा शब्द सहज वाकवण्यासारखा, इतर शब्दांबरोबर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करण्याची शक्यता असणारा शब्द आहे.