वॉशिंग्टन - अंतराळ संशोधनात होत असलेल्या प्रगतीबरोबरच एलियन्स अर्थात परग्रहवासियांबाबत असलेलं मानवाचं कुतुहल अधिकाधिक वाढत चाललं आहे. मात्र अमेरिका आणि ब्रिटनसारखे प्रगत देशही एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अद्याप पूर्णपणे शोध घेऊ शकलेले नाहीत. तसेच त्यांनी एलियन्सचे अस्तित्वही नाकारलेले नाही. या देशांच्या सुरक्षा यंत्रणा यूएफओ आणि एलियन्सबाबतच्या घटनांवर लक्ष ठेवून असतात. काही काळापूर्वी बराक ओबामा यांनीही ते राष्ट्राध्यक्ष असताना यूएफओ संबंधीचे काही व्हिडीओ पाहिल्याचे मान्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. (What would happen if aliens invaded Earth? Shocking information came to the fore)
याबाबत एका संशोधनामधून माहिती समोर आली आहे. अमेरिकेमध्ये चार दशकांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या SETI Instituteचे वरिष्ठ अॅस्ट्रोनॉमर सेठ शोस्तक यांनी एलियन आणि माणसांच्या संभाव्य चकमकीबाबत सविस्तर विवेचन केलं आहे. सेठ शोस्तक यांच्या म्हणण्यानुसार जर कधी एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर माणसांकडे स्वत:च्या बचावासाठी काहीही साधन नसेल. मात्र चर्चित अॅस्ट्रोनॉमर सेठ शोस्तक यांचे असेही म्हणणे आहे की, बाहेरील जगातील कुणी माणसांविरोधात अचानक युद्ध सुरू करेल, असे कुठलेही कारण दिसून येत नाही. मात्र जर असं काही झालं तर हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे मानव एलियन्सना उत्तर देऊ शकणार नाही.
जगातील टॉप एलियन हंटर म्हणून प्रसिद्ध असलेले सेठ शोस्तक यांनी सांगितले की, जर एलियन्सनी हल्ला केला तर मानव त्यांच्या सामना करू शकणार नाही. त्यासाठी आम्ही स्वत:च जबाबदार आहोत. कारण आम्ही योग्य वेळी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शोस्तक पुढे म्हणतात की, एके दिवशी ब्रह्मांडातील कुठल्यातरी कोपऱ्यातून काही तरंग पृथ्वीवर पोहोचतील आणि एलियन्सच्या जीवनाला दुजोरा मिळेल.
SETI Institute ही अशी एक संस्था आहे जी सातत्याने एलियन्सच्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आकाशातील विविध वस्तू स्कॅन करते. सेठ शोस्तक सांगतात की, अन्य ग्रहावरून पृथ्वीवर एलियन्स येणे खूप कठीण आहे. मात्र जर असं घडलं तर जगामध्ये अंधाधुंदी माजेल. मात्र संयुक्त राष्ट्रे आणि जगातील कुठलाही देश या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही आहे.
ते पुढे म्हणाले की, पृथ्वीवरून एलियन्सच्या कुठल्याही संभाव्य संपर्काबाबत आधीपासूनच प्रोटोकॉल तयार करण्याची गरज आहे. आणि SETI Institute याबाबत अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रंची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. सेठ शोस्तक सांगतात एलियन्स एकदम वेगळे असतील. त्यामुळे आधीपासून आखलेली कुठलीही योजना व्यर्थ जाऊ शकते. एलियन्सजवळ आपल्यापेक्षा अधिक अद्ययावत तंत्र असेल. आमच्याकडील सर्वाच चांगल्या रॉकेटला एखाद्या ताऱ्याजवळ जाण्यासाठी एक लाख वर्षे लागू शकतात.