सिडनी : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी ऑस्ट्रेलियाला १९८६ मध्ये एक पत्र लिहिले होते. हे पत्र सिडनी येथील क्वीन व्हिक्टोरिया इमारतीतील एका तिजोरीत ठेवण्यात आले आहे. ते पत्र २०८५ साली उघडण्यात येणार आहे. या पत्रात नेमके काय लिहिले आहे हे राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या कर्मचाऱ्यांनाही ठाऊक नाही. त्यामुळे जगभरात या पत्राबद्दल उत्सुकता वाढली आहे.
राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या राणी पदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटनांबद्दल सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. त्यामध्ये या गोपनीय पत्राचा विशेष उल्लेख करण्यात येत आहे. राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी नोव्हेंबर १९८६ मध्ये ते पत्र ऑस्ट्रेलियाला लिहिले होते. त्यात त्यांनी ऑस्ट्रेलियातील जनतेला उद्देशून एक खास संदेश दिला असल्याचे म्हटले जाते. हे पत्र ऑस्ट्रेलियातील जनतेला पाहण्यासाठी क्वीन व्हिक्टोरिया बिल्डिंगच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते.