गेल्या आठवड्यात ब्राझीलमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एका तरुणीने य़ा घटनेच्या काही क्षण आधीच तिच्या आईला शेवटचा मेसेज पाठवला असल्याचं आता समोर आलं आहे. ९ ऑगस्ट रोजी, प्राडाच्या कास्कावेल ते साओ पाउलोच्या ग्वारुलहोसला जाणारं एक वोपेपास विमानब्राझीलमधील विन्हेडो येथे क्रॅश झालं. विमानाने रात्री ११:५६ वाजता प्राडा कास्कावेल प्रादेशिक विमानतळावरून उड्डाण केलं आणि ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालं.
दुपारी १.२० पर्यंत सर्वकाही सामान्य दिसत असतानाच, ब्राझिलियन वायुसेनेने विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये विमानाची भयंकर अवस्था पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व ६२ प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये ग्रेटर साओ पाउलोच्या फ्रेंको दा रोचा येथील रोसना सँटोस जावियर (२३) चा समावेश आहे.
रोसनाची आई रोसेमेयर जावियरने टीव्ही ग्लोबोसोबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. रोसना त्यावेळी कामासाठी प्रवास करत होती. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी सहसा घरून काम करते परंतु दर दोन महिन्यांनी तिला तिच्या कंपनीच्या मीटिंगसाठी टोलेडोला जावं लागतं. विमानात चढल्यानंतर काही वेळातच रोझानाने तिच्या कुटुंबाच्या ग्रुप चॅटवर मेसेज पाठवले.
रात्री ११.४७ च्या सुमारास, तिने लिहिलं, "यार, दोन तासांची फ्लाइट. आम्ही पावसात उतरणार आहोत. मला या फ्लाइटची खूप भीती वाटते. विमान जुनं आहे." एक मिनिटानंतर ती म्हणाली की, "एक सीट तुटली आहे. इथे गोंधळ आहे." विमानाबाबत तक्रार केल्यानंतर तिने आईला एक सेल्फीही पाठवला, ज्यामध्ये ती नाराज दिसत होती. रोसनाच्या आईने ब्राझीलच्या वृत्तसंस्थेला पुढे सांगितलं की, तिने आपल्या मुलीला शांत होण्यासाठी बायबल वाचण्याचा सल्ला दिला. पण जसजसे मेसेज येत गेले तसतशी काळजी वाटू लागली. अपघाताबाबत समजताच मी उद्ध्वस्त झाली. ओरडत घरभर पळू लागले.
१० ऑगस्ट रोजी, ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना अपघातातील ६२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी विमानाच्या ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू केली आहे. सरकारने सांगितलं की, "एकूण ६२ मृतदेह (३४ पुरुष आणि २८ महिला) सापडले आणि मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यासाठी ते साओ पाउलोच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत.