नवी दिल्ली: गव्हाची निर्यात रोखण्याचा निर्णय मोदी सरकारनं गेल्याच आठवड्यात घेतला. देशात गव्हाचे दर वाढल्यानं केंद्र सरकारनं गहू निर्यात रोखली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं सुरू करण्यात आली. त्यानंतर आता जगासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गव्हाचे दर वाढले आहेत. १ बुशल (२७.२१६ किलो) गव्हासाठी शिकागोमध्ये १२.४७ डॉलर मोजावे लागत आहेत. मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर गव्हाचे दर ५.९ टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या दरात जवळपास ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रशिया आणि युक्रेन जागतिक बाजारपेठेतील सर्वात मोठे गहू निर्यातदार देश आहेत. जगाच्या एकूण गहू निर्यातीत या दोन देशांचा वाटा एक तृतीयांश इतका आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असल्यानं त्याचा परिणाम गव्हाच्या पुरवठ्यावर झाला आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गव्हाच्या दरांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
गहू उत्पादक देशांच्या यादीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. गेल्या हंगामात युक्रेनमध्ये गहू उत्पादनाला खराब हवामानाचा फटका बसला. गव्हाचं उत्पादन कमी झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला. मात्र भारतात गहू उत्पादन चांगलं झालं. त्यामुळे युक्रेनमुळे निर्माण झालेली गव्हाची कमतरता भारतानं भरून काढली. मात्र आता भारतातील महागाई ८ वर्षांतील सर्वोच्च प्रमाणावर आहे. गव्हाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सरकारनं गव्हाची निर्यात बंद केली आहे.