माझा अमेरिकन व्हिसासाठीचा अर्ज मंजूर झाला आहे. व्हिसा असलेला पासपोर्ट मला कधी आणि कसा मिळेल?
उत्तर: व्हिसा अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्हाला पिकअपसाठीची पद्धत विचारली जाईल. तुम्हाला व्हिसा मंजूर झाला असल्यास, अमेरिकन दूतावास तुमचा पासपोर्ट ठेऊन घेईल. त्यात व्हिसा इन्सर्ट केल्यावर तुमचा पासपोर्ट पिकअपसाठी तयार असल्याचा एसएमएस आणि ईमेल तुम्हाला येईल. या प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी https://www.ustraveldocs.com/in/en/ सर्वोत्तम स्रोत आहे. तुमचा पासपोर्ट शक्य तितक्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच ध्येय आहे.
व्हिसा मंजूर झाल्यानंतर पासपोर्ट मिळवण्यासाठी दोन पर्याय आहेत:तुम्ही पासपोर्ट व्हिसा ऍप्लिकेशन केंद्रातून (व्हीएसी) घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला भारत सरकारनं जारी केलेलं ओळखपत्र घेऊन यावं लागेल. जर तुम्ही कुटुंबातील सदस्य किंवा मित्राचा पासपोर्ट घेत असाल, तर तुम्हाला व्हिसा अर्जदाराची स्वाक्षरी असलेलं परवानगी पत्र आणावं लागेल. सोबत तुमचंही ओळखपत्र घेऊन यावं लागेल. अर्जदार १८ वर्षांखालील असल्यास त्याचा जन्मदाखला किंवा शाळेचं ओळखपत्र आणावं लागेल. व्हीएसीमधून पासपोर्ट घेताना कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.
जर तुम्ही व्हीएसीमधून पासपोर्ट घेण्याचा पर्याय निवडला नसेल, तर तुम्हाला एका अर्जदारामागे प्रीमियम डिलिव्हरीसाठी ६५० रुपयांचं अतिरिक्त शुल्क भरावं लागेल. डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला या सेवेसाठी डिजिटल पेमेंट करावं लागेल. तुमच्या ईमेलवर या सेवेची पेमेंट पावती पाठवली जाईल.
तुम्ही १४ दिवसांत पासपोर्ट न घेतल्यास तो पासपोर्ट तुम्ही अमेरिकेच्या ज्या दूतावास/वकिलातीमधून अर्ज केला होता, तिथे परत पाठवण्यात येईल याची नोंद घ्या. त्यानंतर तुम्हाला स्वत: जाऊन त्या दूतावास/वकिलातीमधून पासपोर्ट घ्यावा लागेल.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.