अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखेच वादग्रस्त व्यक्तीमत्व अमेरिकेच्या मंत्रिमंडळात विराजमान झाले आहे. नवे आरोग्य मंत्री रॉबर्ट एफ केनेडी ज्युनिअर हे देखील त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. महत्वाचे म्हणजे हा व्यक्ती लसीच्या विरोधात आहे. कोणत्याही लसीमुळे ऑटिझम आणि इतर आजारांचा धोका होऊ शकतो, असे या महाशयांचे म्हणणे आहे. कोरोना काळात जर ही व्यक्ती मंत्री असली असती तर अमेरिकेची आणखी दुर्धर हालत झाली असती, असेही या व्यक्तीच्या लसद्वेषामुळे म्हटले जाते.
अशातच या महाशयांचे भारताबाबतचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. २०२४ च्या सुरुवातीला एका पॉडकास्टमध्ये केनेडी यांनी हे वक्तव्य केले होते. केनेडी हे २०१० मध्ये भारतात आले होते तेव्हा त्यांच्या डोक्यात किडा घुसलेला असा दावा त्यांनी केला आहे. एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी ते भारतात आले होते. तेव्हा अर्धवट शिजलेले मांस खाल्ल्याने त्यांना ब्रेनवॉर्म झालेला असे ते म्हणाले. कॉम्प्युटर सायंटिस्ट लेक्स फ्रीडमन याला त्यांनी ही मुलाखत दिली होती.
डॉक्टरांना सुरुवातीला तो ट्युमर असल्याचे वाटले परंतू माझी विचार करण्याची समजून घेण्याची क्षमता प्रभावित झाली होती. रॉबर्टने याच मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना टूना फिश सँडविच आवडते आणि ते नियमितपणे खातात. यावरून टीका होऊ लागताच केनेडी यांनी अन्नातून विषबाधा झाल्याने असे झालेले ब्रेनवॉर्ममुळे नाही, असे स्पष्ट केले होते. केनेडी यांनी कोरोनाच्या लसीलाही प्रचंड विरोध केला आहे.
का केली नियुक्ती...अन्न उद्योग आणि औषध कंपन्या बऱ्याच काळापासून अमेरिकेची गळचेपी करत आहेत. या कंपन्या फसवणूक आणि अपप्रचाराचा अवलंब करून पैसे कमवत आहेत. पण आता आपण त्यावर नियंत्रण ठेवू आणि अमेरिकेला पुन्हा महान आणि निरोगी बनवू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. केनेडी पुन्हा वैज्ञानिक संशोधनाचे उच्च मापदंड प्रस्थापित करतील आणि या विभागांमध्ये पारदर्शकता आणतील, जेणेकरून दीर्घकाळ टिकून असलेल्या आजारांना सामोरे जाता येईल असे ट्रम्प यांनी केनेडी यांची नियुक्ती करताना म्हटले आहे.