वूड यू शट अप मॅन? - असं कुणी गल्लीतल्या भांडणात एकमेकांना म्हणालं किंवा अगदी टीव्हीवरच्या डीबेटमध्येही कुणी बोललं तरी आताशा कुणाला आश्चर्य वाटणार नाही; इतका आपल्या सामाजिक चर्चेचा स्तर खालावला आहे. तो किती रसातळाला गेलेला आहे याचं चित्र रोजच्या चॅनलीय चर्चेत आणि समाजमाध्यमांतल्या वितंडवादात एरव्हीही दिसतंच. पण अमेरिकन निवडणुकीचा प्रचार कळसाला पोहोचत असताना विद्यमान राष्टÑाध्यक्षांना राष्टÑाध्यक्षपदाचे दावेदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवार थेट ‘शट अप’ म्हणतात, हे ऐकून-पाहून जगभरातल्या माणसांचे कान टवकारले आहेत. हे सारं घडलं अमेरिकन राष्टÑाध्यक्षीय पदाच्या पहिल्या जाहीर चर्चेच्या फेरीत, अर्थात अमेरिकन निवडणुकीतल्या सुप्रसिद्ध ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’मध्ये.विद्यमान अध्यक्ष ट्रम्प पहिली २० मिनिटे प्रतिस्पर्धी असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडन यांना बोलूच द्यायला तयार नव्हते. बायडन बोलत असताना सतत स्वत: मध्येमध्ये बोलत होते, वाक्य तोडत होते. सूत्रसंचालक म्हणून काम करणाऱ्या क्रिस वालॅस यांनी दोघांना शांत करण्याचा, एकेक करून बोला असं स्पष्ट सांगण्याचा प्रयत्नही केला; पण तो असफल ठरला.
आणि एका क्षणी जो बायडन चक्क ट्रम्पना, गप्प बसा अर्थात शट अप म्हणाले.. या शट अपवरून समाजमाध्यमांत आणि जाणत्या अमेरिकन नागरिकांतही मोठा शिमगा रंगला. काहींना बरं वाटलं की, कुणीतरी तोंडावर ट्रम्पना शट अप म्हणालं, मात्र अनेकांचं असं ठाम मत होतं की, ही काही जाहीर चर्चेत बोलायची रीत नव्हे!ट्रम्प कसे बोलत अथवा वागत होते, नेमके मुद्दे मांडत होते की चर्चा भरकटवत होते यावर वेगळी चर्चा करता येईल, त्यांच्या उद्धट स्वरावरही टीका करता येईल; पण तरीही जाहीर चर्चेत, तेही प्रेसिडेन्शिअल डिबेटमध्ये असं शट अप म्हणणं औचित्याला आणि सामाजिक संकेतालाही धरून नाही, असा एकूण कल दिसतो आहे आणि त्यावरूनच आता समाजमाध्यमांत मोठी चर्चा-वाद रंगले आहेत. ट्रम्प आणि बायडेन या दोघांच्या देहबोलीचीही चर्चा होतेय. एकतर ऐन कोरोनाकाळात ही चर्चा झाली. दोन प्रतिस्पर्धी दोन टोकांना, त्यांच्यापासून दूर बसलेला सूत्रसंचालक,कारण शारीरिक अंतराचे नियम पाळायला हवेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नो हॅण्डशेक. अनेकांना ट्रम्प आणि बायडन यांची देहबोली पाहून असं वाटलं की राजकीय अवकाशात विरोधक असतात; पण पहिल्यांदाच हे दोघे वैरी असल्यासारखे भासले. सर्व महत्त्वाच्या अमेरिकन माध्यमांनी देहबोली विश्लेषक गाठून दोन्ही उमेदवारांच्या देहबोलीतून काय दिसतं, यावर विस्तृत चर्चा करणारे लेख, वृत्तलेख प्रसिद्ध केले आहेत. त्यात बहुतांशांचं म्हणणं की, ट्रम्प नेहमीप्रमाणेच त्यांच्या आक्रमक, उद्धट देहबोलीत होते. चर्चेला सुरुवात झाल्या क्षणापासून ते बायडन यांना सतत ‘टॉण्ट’ मारत होते. अगदी बायडन यांना कॉलेजात किती ग्रेड्स मिळाल्या अशा अत्यंत व्यक्तिगत गोष्टींवरूनही ट्रम्प यांनी कुजकट भाषेत टोमणे मारले; चर्चेचा स्तर आणि स्वर तिथेच आकार घेऊ लागला. बायडन एका प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांना किमान १० वेळा मध्येच तोडत, ट्रम्प आपलाच हेका चालवत होते. त्यामुळे तोल जाऊन बायडन शट अप म्हणाले आणि ट्रम्प ज्यासाठी त्यांना चिडवत होते, ते साधलं असं बोस्टन टाइम्सचा वृत्तलेख म्हणतो.अमेरिकन राष्टÑाध्यक्ष डीबेट, देहबोलीच्या अभ्यासक पॅटी वूड इंडिपेडण्ट या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, ‘राग ही एक मोठी शक्तिशाली भावना आहे, ट्रम्प चर्चा संपेपर्यंत रागातच होते. आक्रमक होते, आपण कुणाला भीत नाही हा तोरा त्यांनी कायम ठेवला आणि त्यांच्या प्रशंसकांना तो आवडलाही असेल, ते बायडेन यांच्याशी नाही तर त्यांच्या मतदार-चाहत्यांशी बोलत होते.बायडन बºयापैकी शांत होते, संयत होते. ते थेट कॅमेºयात पाहून आपल्या मतदारांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. मुख्य म्हणजे त्यांच्या चेहºयावर स्मित होतं, ते हसून बोलले. या चर्चेनं दोन्ही उमेदवारांनी आपली प्रतिमा काय असणार हेच लोकांसमोर मांडलं..’ मात्र एकूण अमेरिकन माध्यमांचा सूर असा दिसतो, की ही चर्चा पाहणं फार वेदनादायी होतं... इट वॉज पेनफुल टू वॉच!