लंडन - ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी (14 मार्च) सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांना वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग ऑक्टोबर 2017 मध्ये नव्याने चर्चेमध्ये आले होते. स्टीफन यांच्या पीएचडीचा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकताच जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि विचारवंत त्यावर अक्षरशः तुटून पडले. प्रबंध वाचण्यासाठी लाखो लोकांनी संकेतस्थळ उघडल्याने केंब्रिज विद्यापिठाचे संकेतस्थळच क्रॅश झालं होतं.
1966 साली स्टीफन यांनी "प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिग युनिवर्सेस" हा प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधास लिहून 50 वर्षे उलटून गेल्यानंतर तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंब्रिजने घेतला. त्यानंतर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना विद्यापीठाचे प्रवक्ते स्टुअर्ट रॉबर्ट म्हणाले होते की, "हा प्रबंध संकेतस्थळावर टाकण्याच्या निर्णयाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 24 तासांच्या अवधीमध्ये हा प्रबंध 60 हजार लोकांनी डाऊनलोड केला, त्यामुळे संकेतस्थळाची गती कमी झाली. काही वेळेस वाचकांना वेबपेज तात्पुरतं उपलब्ध नाही' असा संदेश मिळत होता."
कोण होते स्टीफन हॉकिंग ?हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला होता. हॉकिंग्ज एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यांसारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
2001 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या 'स्ट्रींग' या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग यांनी दिलेलं व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली होती.